पडद्यावरच्या नायिकेचा स्वभाव, मूड आणि अभिनय लक्षात घेऊन तिला गाण्यांपुरता आवाज देणारी सुनिधी चौहान आता ‘सन्स ऑफ राम’ या अॅनिमेशनपटात सीतेच्या पात्राला आवाज देणार आहे. पाश्र्वगायनात सध्याच्या सर्वोच्च गायिकांपैकी एक, अशी कीर्ती मिळवलेली सुनिधी संधी मिळाल्यास अभिनयाकडेही वळण्याची शक्यता आहे. ‘वीक पॉइंट’मध्ये सुनिधीशी मारलेल्या गप्पा…
० अॅनिमेशनपटात एखाद्या पात्राला आवाज देणे हे पाश्र्वगायनापेक्षा वेगळे आहे. पण यात नेमके वेगळेपण, नेमका फरक तू कसा करतेस?
– तुम्ही एखाद्या चित्रपटासाठी पाश्र्वगायन करता, त्यावेळी तुम्ही एका जिवंत माणसासाठी, त्याच्या एखाद्या भूमिकेसाठी आपला आवाज देत असता. तुम्ही त्या माणसाला भेटू शकता. त्याला समजून घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी गाता. मात्र एखाद्या अॅनिमेशनपटातील पात्राला तुमचा आवाज उसना देताना तुमच्यासमोर कोणतीही जिवंत व्यक्ती नसते. ते पात्र केवळ कागदावर अस्तित्त्वात असते. त्यामुळे ते पात्र, संपूर्ण कथा, त्या पात्राची पाश्र्वभूमी या सगळ्याचाच अभ्यास तुम्हाला करावा लागतो आणि ते मोठे आव्हान असते. पण
० सन्स ऑफ राम या अॅनिमेशनपटासाठी आवाज देण्याची संधी तुला कशी मिळाली?
– या अॅनिमेशनपटाचे दिग्दर्शक कुशल रुईया यांनी मला या अॅनिमेशनपटासाठी गाणी गाण्याची संधी दिली. त्यानुसार मी सगळी गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यानंतर लगेचच त्यांनी मला, तू सीतेच्या पात्रासाठी आवाज देऊ शकशील का, अशी विचारणा केली. त्यांच्या मते मी सीतेच्या पात्राला आवाज दिल्यामुळे ते पात्र वास्तवाच्या अधिकाधिक जवळ जाणारे होते. मलाही तो विचार पटला आणि मी ही संधी स्वीकारली.
० पण या आधी तुला अशा प्रकारे आवाज उसना देण्याची संधी मिळाली होती का?
– हो. मी ‘रिओ’ या चित्रपटासाठी आवाज दिला होता.
० एखाद्या पात्राला चित्रपटात आवाज देण्यासाठी भावभावनांची ओळख असणे आवश्यक असते. अभिनयातही हा गुण महत्त्वाचा असतो. पुढे जाऊन तू अभिनय करताना वगैरे दिसशील का?
– मी नेहमीच प्रवाहासोबत जाते. याआधी मी कधी डबिंग केले नव्हते. पण या चित्रपटासाठी डबिंग केल्यानंतर यापुढे कोणत्याही चित्रपटासाठी कोणत्याही पात्रासाठी डबिंग करण्याचा आत्मविश्वास आता मला मिळाला आहे. त्याचप्रमाणे याआधी मी कधी अभिनय केलेला नाही. पण संधी चालून आल्यास मला अभिनय करायला नक्कीच आवडेल. मी माझ्या अंतप्रेरणेवरूनच निर्णय घेते.
० इंडियन आयडॉल’च्या परीक्षणाचा अनुभव कसा होता? सामान्य माणसासाठी अशा स्पर्धा किती महत्त्वाच्या आहेत, असे तुला वाटते?
– माझ्याबद्दल विचारशील, तर इंडियन आयडॉलसाठी परीक्षण करण्याचा माझा अनुभव खूपच चांगला होता. खूप चांगल्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. संगीत आणि गाणे हे माझे पहिले प्रेम आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन देणे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे होते. सामान्य माणसासाठी या स्पर्धेचे महत्त्व नक्कीच खूपच मोठे आहे. पण माझ्या मते, सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याच्यातील असामान्य गुणांची ओळख करून देण्याचे आणि ते गुण जगासमोर आणण्याचे काम या स्पर्धा करतात. त्यामुळे त्या खूप महत्त्वाच्या आहेत.
० रिअॅलिटी शोजची वाढती संख्या ही चिंतेचे कारण नाहीये का? अशा शोजमध्ये सातत्याने भाग घेतल्याने प्रतिभेचे नुकसान होते का?
– या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिसापेक्ष आहे. प्रत्येक कलाकाराने याबाबत विचार करायला हवा. एखाद्याला ते चूक वाटेल, तर एखाद्यासाठी आपल्या गाण्याची सातत्याने परीक्षा घेण्याचा तो मार्ग असेल.
० रिअॅलिटी शो जिंकल्यानंतर पुढची कारकीर्द घडवण्यासाठी गायकाने काय करायला हवे?
– सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रियाज. वयाच्या साठाव्या वर्षीही तुमचा रियाज कायम पाहिजे. अनेक गुणी गायक यश मिळाल्यानंतर या तात्पुरत्या यशाला भुलून रियाज सोडतात. पण ते चूक आहे. रियाज कायम ठेवायला हवा. त्याचबरोबर योग्य संधीची वाटही पाहायला हवी. ही संधी काहींना दोन महिन्यांत मिळते, तर काहींना त्यासाठी दोन वर्षे झगडावे लागते. पण गाण्यावरची श्रद्धा आणि रियाज या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.
० तू स्वत रिअॅलिटी शोमधून आली आहेस. तुझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या दिवसांबद्दल काय सांगशील?
– तो माझ्या आयुष्यातील खूपच भारावलेला काळ होता. त्या काळातली घटका अन् घटका मी खूप आनंदाने उपभोगल्या आहेत. खूप मेहेनत करावी लागली होती, पण आपण काहीतरी नवीन करतोय, हा विश्वास आणि आनंदही होता. पण त्यावेळी केलेली मेहेनत आणि कामावरच्या श्रद्धेमुळे आज मला हे यश मिळाले आहे.
० सध्या चित्रपटसृष्टीत अनेक नवीन कलाकार येत आहेत. या बदलांकडे तू कशी बघतेस? तुला त्यांचे आव्हान वाटते का?
– आव्हान म्हणशील, तर अजिबात नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की, त्यांच्याकडे खूपच चांगली गुणवत्ता आहे. त्यामुळे मी नेहमीच त्यांना प्रोत्साहन देत असते आणि माझ्या शुभेच्छाही त्यांच्या पाठिशी नेहमीच असतील. अशा प्रकारे सशक्त स्पर्धा असेल, तर त्यात चित्रपटसृष्टीचे, संगीताचे आणि पर्यायाने रसिकांचे हित आहे.
० तू दाक्षिणात्य चित्रपटांत गाणी गायली आहेस आणि बॉलिवूडमध्येही. या दोन्ही चित्रपटसृष्टीतील फरक काय आहे?
– गाणे ही माझी नुसती आवड नाही, तर पॅशन आहे. त्यामुळे टॉलिवूड असो किंवा बॉलिवूड, मी सारख्याच श्रद्धेने गाणी गाते. हां, आता एकच फरक आहे. दाक्षिणात्य चित्रपटांच्या गाण्यांची भाषा मला तेवढी चांगली समजत नाही..
० एक व्यक्ती म्हणून सुनिधी कशी आहे? तुझ्या आवडीनिवडी कोणत्या, छंद कोणते?
– एक व्यक्ती म्हणून सुनिधी खूपच फोकस्ड् आहे. माझे लक्ष नेहमी माझ्या ध्येयावर केंद्रीत असते आणि ते गाठण्यासाठी मी नेहमीच मेहेनत करत असते. छंद विचारशील, तर गाणे हा माझा सर्वात मोठा छंद आहे. त्याचबरोबर चित्रपट पाहणे आणि पर्यटन करणे या गोष्टीही मला खूप आवडतात.
० सुनिधीचा वीक पॉइंट कोणता?
– अं.. वीक पॉइंट असा काहीच नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा