दिवाळीच्या चार दिवसात भारनियमन करण्यात येणार नाही, असे ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केलेले असतानाही विद्युत वितरण कंपनीने ग्रामीण भागातील भारनियमनात वाढ केली असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. कृषीपंपांचा वीजपुरवठा थकीत बिलासाठी तोडण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील जनतेत कमालीचा अंसतोष असून वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तालुक्यातील वीज कंपनीच्या सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या घराचे ‘फ्यूज’ काढण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुका शिवसेनेने दिला आहे.
दिवाळीला १० नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. परंतु ग्रामीण भाग अजूनही अंधारात आहे. ऊर्जामंत्री राजेश टोपे यांनी राज्यात ५०० मेगाव्ॉट वीज शिल्लक असून दिवाळीत कुठेही वीज टंचाई भासणार नाही, असे अलीकडेच जाहीर जाहीर केले होते. मात्र ऐन दिवाळीत वीज कंपनीचे अधिकारी ग्रामीण भागात
 जाणीवपूर्वक भारनियमन करून रात्री उशीराने वीज पुरवठा सुरळीत करीत आहेत.
तसेच थकीत वीजबिलासाठी कृषीपंपाची जोडणीही विद्युत कंपनीच्या वतीने तोडण्यात येत आहे.
सध्या शेतीमालाची विक्री थांबली आहे. सरकारने हमी भाव जाहीर केले असले तरी हमी भाव खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे १५ डिसेंबपर्यंत कृषिपंपाची जोडणी तोडण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भारनियमन रद्द न केल्यास आ. प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.