गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत कांॅग्रेस व राष्ट्रवादीची युती होण्याच्या वळणावर पोहोचूनही अखेरच्या क्षणी कांॅग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी घात केला. कांॅग्रेसने राष्ट्रवादीसोबत युती केली असती तर आज ज्या जागा कॉंग्रेसला मिळाल्या त्यापेक्षा किमान १२-१५ जागा अधिक मिळाल्या असत्या. सोबतच राष्ट्रवादीला सुद्धा तीन ते पाच जागांचा लाभ मिळाला असता व भाजपला स्पष्ट बहुमतापासून रोखता येऊ शकले असते, अशी माहिती राष्ट्रवादी कांॅग्रेसचे वरिष्ठ नेते व केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटले यांनी दिली.
ते रामनगरातील निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रात आम्ही समर्थन केलेल्या एफडीआयला मंजुरी मिळाली असली तरी राज्याला एफडीआय लागू करायचा की नाही, ही बाब राज्य सरकारवर अवलंबून आहे. राज्यात आघाडीचे शासन असल्यामुळे यासंबंधी अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. दोन्ही पक्षांची समन्वय समिती चर्चा करून हे ठरविणार आहे. केंद्रातील युपीए सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. कुणी पक्ष वा त्यांचे नेते  कितीही मध्यावधीची घोषणा करीत असले तरी त्या होणार नाही, कारण याकरिता कोणत्याही पक्षाला अनुकूल असे वातावरण सध्या देशात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गोंदिया जिल्ह्य़ाला मंजूर झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाबाबत बोलतांना ते म्हणाले, या मंजुरीकरिता सर्वात आधी आरोग्यमंत्री विजय गावीत गोंदियाला आले असता त्यांच्याकडे मागणी केली होती. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य शासनाच्या सतत संपर्कात राहून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळवून दिली आहे. मुंबईत मंत्रिमंडळाची बठक आयोजित करून त्यात या महाविद्यालयाला हिरवी झेंडी मिळवून दिली होती. आता मंजूर झाल्यावर श्रेय कुणी घेवो, पण काम कुणी केले, हे जनतेला ठावूक आहे. जिल्ह्य़ाच्या विकासाकरिता अदानी विद्युत समूह आणला गेला. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या सिंचनाकरिता धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे कामदेखील सुरू करण्यात आली. धापेवाडाचे पाणी अदानी विद्युत प्रकल्पाला देण्यात येत आहे,असा मुद्दा विरोधक उपस्थित करून उद्योगांची पाठराखण करीत आहेत, मात्र ज्याप्रमाणे आपल्याकरिता धापेवाडा उपसा सिंचन योजना महत्वाची आहे. त्याच तुलनेत अदानी उद्योगसुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. अदानीला लागणाऱ्या कोळशाचे प्रश्न निकाली लागले असून फेब्रुवारी महिन्यात त्याचा विधीवत शुभारंभ होणार आहे.
विद्युत निमिर्तीकरिता २४ रेक कोळसा दररोज लागणार असून हा कोळसा इंडोनेशिया व ऑस्टेलियातून आयात केला जाणार आहे. भंडारा जिल्ह्य़ात बी.एच.ई.एल. भेल उद्योग समूह येत आहे. त्यांच्याकरिता जागा शोधण्याचे काम सुरू आहे. या उद्योगांमुळे दोन्ही जिल्ह्य़ांना फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.
सध्या जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांसोबत जे निलंबनाचे प्रकार घडले ते वाईट आहेत. त्यांना त्यांच्या कर्माची फळे मिळाली.
गोंदिया जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पदाधिकाऱ्यांनी सीईओंला त्यांच्या कक्षात जाऊन मारहाण करणे व डांबून ठेवणे, अशी घटना घडणे जिल्ह्य़ाच्या दृष्टीने योग्य नाही. राजकारण्यांनी विरोध करण्याकरिता अशी पाउले उचलणे योग्य नाही. याचे पडसाद सगळीकडे उमटतात व यामुळेच त्यांना गोंदिया जिल्हा पनिशमेंट पोस्ट वाटते व येथे यायला अधिकारी घाबरतात. गोंदिया नगरपालिकाच्या व जनतेच्या समस्यांबाबत चर्चा केली असता यावर त्यांनी आपण स्वत दुखी असल्याचे सांगत या परिस्थितीवर आपण काहीच करू शकत नसल्याचे सांगितले.
सध्या नगरपालिकेत जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला सहन करण्यापलीकडे काहीच आपल्याकडे नसल्याचेही सांगून त्यांनी खंत व्यक्त केली. पत्रकार परिषदेला आमदार राजेंद्र जैन, दामोदर अग्रवाल उपस्थित होते.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा