स्वत:जवळ चारचाकी किंवा दुचाकी वाहन असेल तरच आपण रोडपाली नोड येथे घर घ्या, असे बोलण्याची वेळ येथे राहणाऱ्या नागरिकांवर आली आहे.
कळंबोली शहराची हद्द वाढवून सिडकोने रोडपाली नोड वसविले. येथील सेक्टर-१७ ते २० परिसर हा शीव-पनवेल महामार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या परिसरात पोहचली नाही. येथील रहिवाशांना नोकरीचे ठिकाण गाठण्यासाठी रोजची परेड किंवा तळोजा-रोडपाली लिंक रोडवरून जाणाऱ्या वाहनांकडे लिफ्ट मागण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. विशेष म्हणजे या परिसरात नवी मुंबई पोलीस मुख्यालय आहे. पोलिसांना वर्षभरापासून सकाळ-संध्याकाळी कोणताही हुकूम नसताना परेड करून महामार्ग गाठावा लागत आहे.
रोडपाली येथे अनेक चाकरमान्यांनी ३० लाख ते ६० लाख रुपयांपर्यंत कर्ज काढून घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. परंतु या चाकरमान्यांना नोकरीचे ठिकाण गाठण्यासाठी रोज सकाळी पायपीट करावी लागत आहे. यातच कामोठे थांब्यावरून या परिसरात येण्यासाठी रिक्षाचालकांचा मीटर डाऊन होत नसल्याने मनमानी भाडे आकारून प्रवाशांची येथे लूट सुरू आहे.  एनएमएमटी, एसटी महामंडळाच्या बससेवा सुरू होईपर्यंत येथे शेअर रिक्षा चालाव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. स्प्रिंग इमारतीशेजारील चौकात काही इको व्हॅनचालकांनी बेकायदा प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. खारघर रेल्वेस्थानकापर्यंत प्रति प्रवासी दहा रुपये घेऊन इकोव्हॅनचालक शेअर भाडे या मार्गावर चालवितात. या संदर्भात एनएमएमटीचे प्रभारी व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांना विचारले असता, रोडपाली येथे यापूर्वीच डीमार्टपर्यंत ३० क्रमांकाची उरणपर्यंत धावणारी बससेवा सुरू आहे.
रोडपाली येथील नागरिकांना मानसरोवर, खारघर रेल्वेस्थानकापर्यंत जाणारी बससेवा हवी असल्यास त्यांनी लेखी मागणी एनएमएमटी प्रशासनाकडे करावी. त्याबद्दल नक्कीच विचार केला जाईल असे सांगितले.