निवडणूक जिंकायची असेल तर स्वत:चे मत विकण्याचे थांबवा, अशा कानपिचक्या देत येत्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जागांवर परिणाम होईल, असे मत भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी व्यक्त केले. भारिप-महासंघाच्या मराठवाडय़ातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आंबेडकर बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहिले. आता ते लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहेत. त्यांच्या निवडणूक न लढविण्याच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या जागांवर परिणाम होऊ शकतो. ‘आप’मुळेही राष्ट्रवादीला धोका असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी यांच्या संदर्भात केलेले वक्तव्यही चुकीचे आहे. मोदी पंतप्रधान होणार, अशी भीती काँग्रेसवाल्यांमध्ये दडली आहे. त्यामुळे गांगरून जाऊन त्यांनी ते विधान केले. केवळ उमेदवार जाहीर करून काँग्रेस व भाजपने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन पक्षांव्यतिरिक्त तिसरा पर्यायच उपलब्ध नाही, असे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.
महाराष्ट्र लोकशाही आघाडीची स्थापना करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीत सर्व जागा लढविण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे. काँग्रेसने या आघाडीत यायचे की नाही, या बाबतचा त्यांचा निर्णय होणे बाकी आहे, असेही ते म्हणाले. भारिप-बहुजन महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी कानपिचक्या दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा