राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व्यक्ती घडविण्याचे कार्य करते. अशा संस्कारक्षम व्यक्तींनी गाव बांधायचे कार्य करावे म्हणजे देश आपोआप उभा राहील. महात्मा गांधींनी स्वावलंबी गावांचा आग्रह धरला होता. त्याही पुढे जाऊन योगी अरविंदांनी ग्रामसंकुलाची संकल्पना मांडली. काही गावांनी एकत्र येऊन ग्राम संकुलाचा विकास करायचा, सामूहिक शक्तीने ते सहज शक्य होते, अशाच पध्दतीने देश घडतो आणि असा देश अवघ्या जगाचे नेतृत्व करायला अग्रेसर होतो. आम्हाला असाच देश घडवायचा आहे, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे क्षेत्र सहकार्यवाह डॉ.रवींद्र जोशी यांनी केले.
रा.स्व.संघाच्या चंद्रपूर नगराचा विजयादशमी उत्सव लोकमान्य टिळक विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात प्रमुख वक्ता म्हणून डॉ. रवींद्र जोशी बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.अजय वासाडे, रा.स्व.संघाचे जिल्हा संघचालक वसंत थोटे, नगर संघचालक अ‍ॅड.रवींद्र भागवत व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. जोशी म्हणाले, देशाच्या राजकीय नेतृत्वात राष्ट्रीय भावना नाही. राष्ट्रजीवनातील हीच महत्वाची उणीव आहे आणि म्हणून देशाची पाऊले दमदारपणे पुढे पडत नाहीत. परकीय आक्रमणाला रोखण्यासाठी विजयी भाव जागृत होण्याची गरज आहे. या देशाला विश्व विजय मिळवायचा आहे आणि हेच या देशाची नियती आहे. मात्र, त्यासाठी या देशातील गावे सक्षम झाली पाहिजे. धुळय़ाजवळ बरीपाडा येथील चैतराम पवार यांनी त्यांचे गाव स्वयंपूर्ण केले. ते इतके की, महाराष्ट्र सरकारलाही ग्राम विकासासाठी या गावाचा आदर्श घ्यावा लागला. भारतात सर्वाधिक शहरीकरण होत आहे. हा सध्या मोठा चिंतेचा विषय आहे. आपण हे थांबवू शकत नाही, पण गावे सक्षम करून शहरीकरणाची गती जरूर मंद करू शकतो. गाव विकासाचे आव्हान मोठे आहे, असेही ते म्हणाले.
संघाला गौरवशाली इतिहास आहे. संघाचे सेवाकार्य देशाच्या गावोगावी आणि दुर्गम भागात चालतात. संघाचे गावबांधणीचे कार्य हाती घेतले पाहिजे. संघाची कार्यपध्दतीच या देशाला योग्य दिशा देऊ शकते, अशी अपेक्षा डॉ. अजय वासाडे यांनी व्यक्त केली, तर अ‍ॅड.रवींद्र भागवत यांनी प्रास्ताविक केले. भारतातील सर्व जिल्हे व तालुक्यांमध्ये संघाची शाखा भरतेच. शिवाय, ४७ देशातून संघकार्य चालते. संघाच्या प्रेरणेने अनेक संस्था, संघटना देशात आणि जगभरात कार्यरत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. संघ स्वयंसेवकांनी योगासन, सूर्य नमस्कार व समतेचे प्रात्याक्षिके सादर केली. दंडक्रमिका व योगाचेही उत्कृष्टपणे सादरीकरण केले. सुभाषित, अमृत वचन, सांघिक गीत आणि वैयक्तिक गीत सादर करत असतांना संघाची शिस्त प्रसूत होत होती. कार्यक्रमाला नगरातील मान्यवर आणि सर्व स्वयंसेवक हजर होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा