खासदार सुळे यांचे प्रतिपादन
राज्याच्या महिला धोरणास आता २० वर्षे पूर्ण होत आहेत. या धोरणात काही बदल करण्याची आवश्यकता आहे. युवती व महिला मेळाव्याच्या माध्यमातून पुढील महिला धोरण कसे असावे, याबाबत महिलांशी संवाद साधला जात आहे. महिलांची मते जाणून घेऊन त्याप्रमाणे बदल केल्यास येणारे नवीन महिला धोरण सशक्त असेल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे पत्रकार परिषदेत  स्पष्ट केले.
राष्ट्रवादी महिला मेळाव्यास येथे आल्या असता पत्रकारांशी त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महिला व युवतींचे संघटन झाल्यास राज्यात सामाजिक परिवर्तन घडेल. त्यामुळे दारूबंदी, हुंडाबंदीसारखे प्रश्न सुटतील असा विश्वास सुळे यांनी या मेळाव्यात व्यक्त केला. सीटी क्लब मैदानावर हा मेळावा झाला. व्यासपीठावर आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते, पालकमंत्री प्रकाश सोळंके, आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान, प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, सुरेश वरपुडकर, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना बुधवंत, महापौर प्रताप देशमुख, जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, स्वराजसिंह परिहार, शशिकला चव्हाण, प्रेरणा वरपुडकर आदी उपस्थित होते.
अन्याय व अत्याचाराच्या विरोधात एकत्रित सामना करण्याची आवश्यकता आहे. सन १९९४मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना राज्यात महिला धोरण आले. आरक्षणामुळे महिलांना सन्मान मिळाला. हुंडाबंदी झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. खेडोपाडी गुटखाबंदी असल्याने महिलांनी येत्या होळीला गुटखा जाळून टाका, असे आवाहनही केले.
युवती व महिलांनी सत्तेच्या माध्यमातून सत्तेचा उपयोग समाजपरिवर्तनासाठी करावा, असे त्या म्हणाल्या.पालकमंत्री सोळंके व फौजिया खान यांनी अवैद्य दारूविक्री बंद करण्यासाठी कडक पावले उचलली जातील, अशी ग्वाही दिली. मंत्री पाचपुते यांनी दारूबंदीसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. मेळाव्यात विद्या चव्हाण, सुरेश वरपुडकर, प्रताप देशमुख, मीना बुधवंत, मीनाक्षी निरदुडे, मीना राऊत, शशिकला चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रमाकांत कुलकर्णी यांनी केले.

Story img Loader