आत्मविश्वास आणि धोका पत्करण्याची तयारी असेल तर युवकांनी नक्कीच व्यवसायाकडे वळावे, असे प्रतिपादन हिंदुस्थान हार्डी स्पायसर लिमिटेडचे कार्यकारी संचालक अशोक राजवाडे यांनी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर तसेच येथील ब्रह्मा व्हॅली इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या वतीने आयोजित ‘मला उद्योजक व्हायचंय’ या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शिक्षणाबरोबरच उद्योजकता प्रशिक्षण मिळणे ही आजच्या तरुण पिढीसाठी जमेची बाब आहे. त्याचा सार्थ उपयोग या पिढीने करावा असे आवाहनही त्यांनी केले. चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी प्रास्ताविकातून महाराष्ट्र चेंबर सातत्याने नवउद्योजक निर्माण व्हावेत यासाठी अशा कार्यशाळा व प्रशिक्षण वर्ग आयोजित करीत असल्याचे सांगितले. ब्रह्मा व्हॅली इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक प्रा. शिवाजी पाटील यांनी इन्स्टिटय़ूटच्या कार्याची माहिती दिली.
या उद्योजकता प्रशिक्षण कार्यशाळेत डॉ. मुंजे इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष डॉ. दिलीप बेलगावकर यांनी उद्योजकता या विषयावर प्रात्यक्षिक व विविध व्यावहारिक उदाहरणांद्वारे मार्गदर्शन केले. ईएसडीएस लिमिटेडचे संचालक विक्रम जपे यांनी उद्योजक होण्यासाठी भाषा, कामाविषयीचे प्रेम आदी गोष्टी अंगीकारणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक एम. के. गाल यांनी बँकिंग व फायनान्स यातील बारकावे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले. अनमोल सेल्सचे सोमनाथ राठी यांनी उद्योजक होण्यासाटी स्वत:मधील गुणदोष ओळखण्याचे आवाहन केले. प्रा. सुरेंद्र कासार यांनी स्वत:चा उद्योग अथवा व्यवसाय असणे बंधनकारक नसून नोकरीत असतानाही या लोकांना उद्योजकांप्रमाणेच विचार करण्याची मुभा व्यवस्थापनाकडून दिली जाणे हे नावीन्यपूर्व असल्याचे सांगितले.
याप्रसंगी ब्रह्मा व्हॅली इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य सी. के. पाटील, बी. एड. कॉलेजच्या प्राचार्या कल्पना पवार, महाराष्ट्र चेंबरचे सचिव चंद्रकांत दीक्षित, ब्रह्मा व्हॅली इन्स्टिटय़ूटचे प्रा. के. के. ढोमसे आदींसह युवक-युवती मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा