शब्दांचा कैफ उलगडणारा ‘नवाज’
चर्चेतला चेहरा
मळकट, काहीसे चुरगळलेले कपडे, मानेपर्यंत रुळणारे पांढरे केस, त्याच रंगाची दाढी. जगण्याचा ‘कैफ’ अनुभवताना शब्दांनी विश्व उलगडून दाखवणारा हरहुन्नरी कलावंत, बशर नवाज! जीवन जगण्याच्या धावपळीत भूपेंद्र यांच्या आवाजातील ‘करोगे याद तो हर बात याद आयेगी’ ही गजम्ल कानावर पडते तेव्हा साहजिकच शायर म्हणून बशर नवाज मनाचा ठाव घेऊन जातात. ते अनेकांना भेटतात, कधी गुलाम अलींच्या आवाजात तर कधी मेहदी हसनच्या. भडकल गेटजवळच्या रिक्षा स्टँडवर कोणालाही विचारा, ‘बशर नवाज कोठे राहतात?’ कोणीही पत्ता सांगेल. कारण त्यांचे ‘मशहूर’ असणे नाही, तर त्यांच्या मिसळण्याच्या वृत्तीमुळे बशर नवाज लोकप्रिय. त्यांच्या चार पिढय़ा याच परिसरातल्या.
माणूसच वल्ली. तारुण्यात मारामाऱ्या केल्या. राजकारण केले. गज्मलेची गाठ पडली नि शब्दांना जगणे सापडले. दोन ओळींतले अंतर व अमूर्ततेला घातलेली साद यामुळे त्यांचे काव्य लोकप्रिय झाले. व्यक्त करण्याच्या अनोख्या हातोटीमुळे बशर नवाज ज्या उंचीवर गेले त्या रांगेत काही मोजकेच शायर आणि गीतकार आहेत. कवी नीरज यांची गाणी जशी रुंजी घालतात, तसेच बशर यांची गजम्ल गुणगुणायला भाग पाडते.
सोपे लिहिणे अवघड हे बुजुर्ग बशर आवर्जून सांगतात. स्वत:च्या पहिल्या गज्मलेचे वर्णन ‘मुश्कील जुबाँ’ असे करतात.
जब कैफ का आलम होता है, जब नूर की बारीश होती है,
ए ऐशोतरफ के मालिक सून, एक दर्द का मारा रोता है!
बशर यांची गजम्ल माहीत होत गेली ती १९८५नंतर. ‘बाजार’मध्ये ती गजम्ल सामान्य माणसाच्या ओठावर आली. तत्पूर्वी बशर नवाज मुंबईला गेले. पण तेथील वातावरण त्यांना मानवले नाही.
काम मिळावे म्हणून कोणाची तरी तासन्तास वाट पाहणे, त्यांना हवे तसे काम देणे हे त्यांच्या स्वभावात बसणारे नव्हते. वडील शिक्षक. मुंबईत भाऊ टपाल खात्यात. त्यामुळे जगण्याची भ्रांत असे काही नव्हतेच. एकदा त्यांना प्रसिद्ध शायर, गीतकार जावेद अख्तर म्हणाले, ‘तुम मुंबई में टीक नहीं पाओगे, यहाँ तो दो ही लोग बडे होते है। या तो जिनके फाँके पडते है, या जिनको पैसे की कोई फिक्र नहीं होती।’ त्यांचे हे तत्त्वज्ञान लागू पडल्याचे बशर नवाज आवर्जून स्पष्ट करतात. ते परत औरंगाबादला आले. येथे त्यांचे मित्रही खूप. सलीम काझी, वाहिद अख्तर हे दोघे शायरीतील दर्दी. मराठी कवी त्र्यंबक महाजन यांच्याशीही चांगला दोस्ताना. शायर सिकंदर अली वज्द त्यांना ज्येष्ठ होते.
शायरी सुरू केली तेव्हा अनेकजण विशिष्ट हेतू ठेवून लिहायचे.बरीच पुरोगामी मंडळी ‘टोकदार’ लिहू लागली होती. गज़्‍ाल, कविता, साहित्य याऐवजी विचार पेरण्याचेच काम सुरू झाले होते. ‘आदेश’ आला की लिहायचे.
‘उडके रहेगा सुर्ख फरेरा, मुल्क हमारा हो के रहेगा’, अशी नारेबाजीच साहित्यात डोकवायची. हे बशर नवाज यांनी बदलले. त्यांनी लिहिण्यात रोमँटिझम आणला. वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी तो रोमँटिझम त्यांना मुखपाठ आहे.
जब छायी घटा लहराई धनक,
एक हुस्न-ए-मुकम्मल याद आया,
उन हातोंकी मेहंदी याद आयी,
उन आँखो का काजल याद आया!
त्यांच्या अशा शायरीला लोकांनी डोक्यावर घेतले. सामान्यांची मानसिकता, बौद्धिक पातळी, मनातील साचलेपण यावर बशर नवाज चपखल लिहितात. ते म्हणतात, स्वत:शी प्रामाणिक राहून लिहायला हवे. जे चांगले असते, ते टिकते. आतून यायला हवे, मग प्रेमभावना असो की सायकॉलॉजी. लेखकाला तो क्षण अनुभवता आला पाहिजे, तरच खोली वाढते. त्या प्रसंगाला जगता आले तरच नज्म्म, कविता, गज़्‍ाल सामान्य माणसाला भिडते. लिहिण्याचा पटल कोणता? कवेत घेण्याची शक्ती किती? व्यापकता यावर बरेच काही ठरते.
१९६२मध्ये एका चित्रपटासाठी गज़्‍ाल लिहिली आणि तो चित्रपट आपटला, असे ते सहज सांगतात. काही बडेजाव नाही की आत्मप्रौढी. काही पडलेल्या चित्रपटांतील गाणी चांगली होती, असेही ते सांगतात. तो काळ पहिलवान हीरोंच्या भूमिकेचा होता. एक गज़्‍ाल लिहिल्याने त्यांची आणि पृथ्वीराज कपूर यांची भेट झाली. तो जमाना स्क्रीन आणि फिल्मफेअरच्या आकर्षणाचा होता. लोक ही नियतकालिके आवर्जून वाचत. त्यामुळेच गाणी लिहिण्यासाठी पृथ्वीराज कपूर यांनी जाहिरातच दिली होती. ती जाहिरात पाहून बशर नवाज यांनीही गाणे पाठविले. विशेष म्हणजे ते निवडले गेले आणि त्याची जाहिरात झाली – ‘वन अमंग द फाईव्ह थाऊजंड’ पाच हजार गाण्यांतून झालेली ही निवड निश्चितच त्यांना आनंद देणारी होती. पुढे ‘करोगे याद..’ हे गाणे ज्याच्या त्याच्या ओठी आले आणि बशर नवाज वलयांकित झाले.  त्यांनी जेवढय़ा गज़्‍ाल लिहिल्या, जेवढय़ा कविता केल्या, त्यापेक्षा अधिक स्वागतगीते लिहिली. येणाऱ्या पाहुण्यांसाठी स्वागतगीत लिहून घेणारे नेते होते. अगदी संजय गांधी यांच्यासाठीही स्वागतगीत लिहिल्याचा अनुभव ते सांगतात. कारण या स्वागतगीताने त्यांनी वादही अंगावर ओढवून घेतला होता. शब्दांची अफाट ताकद अनुभवणारा हा कवी आजही म्हणतो, ‘मुझे जीना नहीं आता’.. पण त्याचवेळी त्यांची गज़्‍ाल अशी हळुवारपणे प्रेमाला साद घालते.
जुल्फे खुली तो मस्त घटा घिरके छा गई,
आँचल उडा तो जैसे कयामत सी आ गई,
देखा जो मुस्कुरा के तो कलियाँ बिखर गई,
तेरी अदा बहार का मंजर दिखा गई।

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा