तालुक्यातील मुकणे धरणाची उंची वाढविण्यास परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध असून हा विरोध डावलून द्वार बांधण्याच्या हालचाली पाटबंधारे विभागाकडून होत आहेत. हे द्वार बांधल्यानंतर आरक्षित पाण्याबरोबर वैतरणा धरणाचे पाणीही गोदावरी कालव्याद्वारे कोपरगावला नेण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकटवले आहेत, परंतु त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील शेती धोक्यात येणार असल्याने कोणत्याही स्थितीत वैतरणा धरणाचे पाणी गोदावरी कालव्याला पर्यायाने कोपरगावला जाऊ देणार नाही, असा इशारा माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी दिला आहे. हक्काच्या पाण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
तालुक्यातील दारणा, मुकणे यांसह वैतरणा धरणाचे पाणी गोदावरी कालव्याद्वारे शेतीसाठी मिळावे यासाठी कोपरगावातील सर्व पक्षीयांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून आपली मागणी पाटबंधारेमंत्री सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे. ही मागणी तटकरे यांनी मान्य करीत आगामी काही दिवसांत दारणा, मुकणे यांसह वैतरणा धरणातूनही पाणी सोडण्याचे शासनाचे धोरण असून हे धोरण म्हणजे इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना हक् काच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोपही मेंगाळ यांनी केला.
या विरोधात तालुक्यातील सर्व पक्ष सामूहिक लढा देतील, असा इशारा त्यांनी दिला. कोपरगावच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी इगतपुरीतील शेतकऱ्यांचा बळी देऊन, त्यांच्या सुपीक जमिनी धरण वाढीच्या नावाखाली नष्ट करण्याचा डाव रचला जात आहे. शेतकरी हा डाव उधळून लावतील, असा इशाराही मेंगाळ यांनी दिला.

Story img Loader