कल्याण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या मुख्य जलवाहिन्या तसेच जलकुंभांमधून नेमका किती पाणीपुरवठा होतो, याचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी मीटर बसविण्यात यावे, अशी मागणी एकीकडे जोर धरत असताना दुसरीकडे मात्र बेकायदा बांधकामांना होणाऱ्या पाणीपुरवठय़ाचे िबग फुटेल या भीतीने हे मीटर बसविण्यात टाळाटाळ होत असल्याची माहिती पुढे आली आहे.
महावितरण कंपनीने वीजचोऱ्या थांबविण्यासाठी प्रत्येक विभागात वीजपुरवठय़ाच्या मार्गावर वीजमीटर बसविले आहेत. जेवढे ग्राहक त्या प्रमाणात विजेचा पुरवठा व्हावा, असा यामागचा उद्देश आहे. वाढीव वीजपुरवठय़ामुळे अनेक चोऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्या. वीजचोरी रोखणे त्यांना शक्य झाले. त्याचप्रमाणे पाणीपुरवठा विभागाने महापालिकेच्या मुख्य जलवाहिन्या तसेच विविध विभागांत असलेल्या पाण्याच्या मोठय़ा टाक्यांवर मीटर बसवावे, असा प्रस्ताव गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे.
मात्र यामुळे शहरातील बेकायदा बांधकामांना होणाऱ्या पाणी पुरवठय़ाचे िबग फुटेल, या भीतीने मीटर बसविण्याची योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होत नाही, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत केला.

Story img Loader