शहरातील कराचीवाला या मुख्य बाजारपेठेत भरधाव मालमोटारीखाली सापडून खुश जैन या सात वर्षीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहनधारक, पालक, शिक्षक, समाजसेवक, व्यापारी आणि प्रशासकीय यंत्रणा सजग झाल्याचे म्हटले गेले. तथापि, नेहमीप्रमाणे दोन-चार दिवस वाहतुकीची काळजी घेण्यापलीकडे कायमस्वरूपी ठोस अशी उपाययोजना झाल्याचे दिसत नाही.
येथील पारोळा रस्त्यावर काही दिवसांपूर्वी सकाळी साडे सात वाजता खुश अमित जैन या शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. रिक्षाला मालमोटार घासून गेली आणि त्याचवेळी रिक्षा बाहेर फेकला जाऊन खुश मालमोटारीच्या मागच्या चाकाखाली सापडला. अवघ्या काही क्षणात घडलेल्या घडलेल्या अपघाताने सारे सुन्न झाले. ज्या अ‍ॅटोरिक्षामधून खुशचे अन्य मित्र निघाले होते, त्यांनी स्वत:च हा प्रसंग पाहिल्याने या लहानग्यांची मनस्थिती कशी झाली असेल याची कल्पना करता येईल. या घटनेने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीतील सुरक्षिततेच्या विषयावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या अपघातानंतर शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत ठोस निर्णय वा कार्यवाही होणे अपेक्षित होते. तो अद्याप झालेला नाही. प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांकडून दोन-चार अ‍ॅटो रिक्षांची तपासणी करण्याची थातुरमातूर कारवाई सुरू आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी ही काही खास उपाययोजना आहे असे म्हणता येणार नाही.
शहरवासीयांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाने अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध बडगा उगारला असला तरी दुसरीकडे किती शाळा, व्यवस्थापन आणि पालक धोकादायक विद्यार्थी वाहतुकीवर उपाय सुचविण्यासाठी पुढे आले हा संशोधनाचा मुद्दा आहे. त्यास काही संस्था व संघटनांचा अपवाद असला तरी पुढे सरसावलेल्या या संस्थांचे बळ इतके कमी होते की प्रशासनाकडूनही त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी शहरांतर्गत होणाऱ्या वाहतूक व्यवस्थेबाबत शहरवासीयांच्या सूचना मागविल्या आहेत.
पाच जुलैपर्यंत शहर आणि जिल्ह्यातून पालक-शिक्षकांसह सर्वच स्तरातील व्यक्ती वाहतुकीबाबत सूचना करतील आणि त्या आधारे शहरांतर्गत वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृती आराखडा तयार करून तो शासनाकडे सादर करण्याचा मनोदय बंग यांनी व्यक्त केला आहे.
रिक्षामधून किती विद्यार्थ्यांची वाहतूक करावी, याचा कोणताही ताळमेळ नाही. केवळ सहा विद्यार्थ्यांनाच नेता-आणता येईल असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असले तरी त्याचे किती वाहनधारक पालन करतात, हा प्रश्न आहे. धोकादायक वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी या विषयाचा अभ्यास असलेले अधिकारी-कर्मचारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांची मदत घेता येईल. त्यात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या अ‍ॅटोरिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेता येईल.
या दृष्टीने पावले टाकली न गेल्यास अपघातांची मालिका अशीच सुरू राहील.