तालुक्यातील बाबुर्डी येथील ग्रामपंचायत कार्यालयात उशिरा झालेल्या ध्वजारोहण प्रकरणी जिल्हा परीषद प्रशासनाकडून दोषी ग्रामसेवक व प्राथमिक शिक्षकावर काहीच कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या दोषींना पाठीशी घालण्यासाठी बाबुर्डीच्या सरपंचासह अन्य पुढारी सरसावले असून शासकीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसा अर्जही गटविकास अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे.
प्रजासत्ताकदिनी दि. २६ जानेवारीला बाबुर्डीच्या ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी पावणेदहा वाजता ध्वजारोहण झाले. ग्रामपंचायत कार्यालयाचा झेंडा प्राथमिक शिक्षक दत्तात्रेय गवळी यांनी स्वत:च्या घरी लपवून ठेवला. ग्रामसेवक राजू पटेकर यांच्याशी असलेल्या रोषातून गवळी यांनी ध्वजारोहणाचा राष्टीय कार्यक्रमच वेठीस धरला. ठरल्याप्रमाणे सकाळी आठ वाजता ध्वजारोहण न झाल्याने गावभर एकच संतापाची लाट उसळली. तालुका प्रशासनास ही माहिती कळविण्यात आल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकाऱ्यांना तेथे पाठवून उपस्थितांचे जबाब नोंदविले.
ध्वजारोहणास ग्रामसेवक तसेच प्राथमिक शिक्षकामुळेच उशिर झाल्याचे जबाबातून स्पष्ट झाले आहे. तसा अहवालही गटविकास अधिका-यांनी तयार केला. मात्र हा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्याऐवजी दि ३ फेब्रुवारीपर्यंत पंचायत समितीतच पडून होता. गेल्या दि. ३ ला हा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आल्याची माहिती पंचायत समितीकडून देण्यात आली. मात्र जिल्हा परिषदेनेही या गंभीर प्रकरणाची अद्याप दखल घेतली नाही.

Story img Loader