बहुप्रतीक्षित भारतीय व्यवस्थापन संस्थेला (आयआयएम) केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली असून येत्या शैक्षणिक सत्रापासून ते सुरू होणार आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यावतीने निवड आधारित श्रेणी(क्रेडिट) व्यवस्था तसेच कौशल्य श्रेणी आधारित आराखडा याबाबत सर्व राज्याच्या शिक्षण मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
त्याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याशी चर्चा केली. त्यात आयआयएम नागपुरात स्थापन होणार असून अभ्यासक्रम २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांपासून सुरू होईल. अहमदाबादचे आयआयएम नागपुरातील आयआयएमचे पालकत्व स्वीकारणार असल्याचे निश्चित झाले.
आयआयएमला मिहानमध्ये जागा मिळाली असून व्हीएनआयटीमध्ये तात्पुरती सोयही करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी आयआयएमची घोषणा जुलै महिन्यात केली होती.
बिहार, ओरिसा, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यात आयआयएम स्थापन करण्याचे केंद्राने ठरवले होते. त्या पाश्र्वभूमीवर नागपुरातील आयआयएमवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मिहानमधील २९३ एकर जागा गेल्याचवर्षी ताबडतोब देऊ केली होती. आयआयएम लवकर सुरू व्हावे म्हणून तात्पुरत्या परिसरासाठी विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील (व्हीएनआयटी) ६ हजार ११६ चौरस मीटर जागाही जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिली आहे.
व्हीएनआयटी परिसराचे दर महिन्याला ६ लाख रुपये भाडे प्रस्तावित असून संबंधित जागेचा अहवाल विभागीय सहसंचालकांनी शासनास सादर केला होता.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने याचा केंद्रातील मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी पाठपुरावा करून आयआयएमचा प्रश्न मार्गी लावला.

Story img Loader