दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच पर्यावरण संवर्धनातही आपण देशातील इतर शिक्षणसंस्थांच्या तुलनेत एक-दोन नव्हे तर दहा पावले पुढे असल्याचे पवईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) दाखवून दिले आहे. कारण आता आयआयटीने पवईतील सुमारे ५०० एकर पसरलेल्या आपल्या कॅम्पसवरील तब्बल २७ टक्के इमारतींना लागणारी वीज सौरऊर्जेतून मिळविण्याची योजना आखली आहे. या योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जा क्षेत्रात झालेले संशोधन चार भिंतीच्या बाहेर काढून व्यावहारिक जगात ‘फिट’ बसविण्याबरोबरच आयआयटीने आपला ‘गो ग्रीन’चा नाराही बुलंद केला आहे. एखाद्या शिक्षणसंस्थेमध्ये ऊर्जा स्वयंसिद्धतेच्या दृष्टीने इतक्या मोठय़ा स्तरावर होणारा हा पहिलाच प्रयोग आहे.
योजनेची सुरुवात आयआयटीच्या एक चतुर्थाश इमारतींवर ‘सोलर फोटोव्होल्टीक पॅनेल्स’ (पीव्ही) बसवून केली जाणार आहे. ‘एप्रिल ते मे दरम्यान ही पॅनेल्स बसविण्याचे काम पूर्ण होईल,’ अशी माहिती आयआयटीच्या ‘एनर्जी सायन्स आणि इंजिनिअरिंग’ या विभागाचे असोसिएट प्राध्यापक चेतनसिंग सोळंकी यांनी ‘वृत्तान्त’ला दिली. पॅनेल्स बसविण्याचे काम ‘महिंद्र सोलर’ या कंपनीला देण्यात आले आहे. ८ कोटी रुपयांच्या या योजनेसाठी संस्थेला केंद्र सरकारकडून काही अनुदान मिळाले आहे. या उपक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी आयआयटीने ‘ग्रीन कॅम्पस कमिटी’स्थापन केली होती. प्रा. सोळंकी या समितीचे सदस्य आहेत. चिरंतन ऊर्जा या विषयावर आयआयटीची ग्रीन कॅम्पस समिती पूर्णवेळ संशोधन करते आहे. या उपक्रमातून इतर संस्थांपुढे आदर्श निर्माण करण्याचा आयआयटीचा विचार आहे. ‘सौर ऊर्जेचे फायदे पाहता देशातील सर्व सरकारी, खासगी, व्यावसायिक, शैक्षणिक आदी इमारतींना ही योजना राबविणे बंधनकारक केले पाहिजे. तशी सूचना आपण केंद्र सरकारला करणार आहोत,’ असे त्यांनी सांगितले. सध्या इंदूरच्या आयआयटीमध्ये या प्रकारचे पॅनेल्स बसविण्याची योजना आहे.
पॅनेल बसविण्यात आलेल्या इमारतींवर पीव्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तब्बल एक मेगावॅट वीज निर्माण केली जाणार आहे. यामुळे पारंपरिक वीजेचा वापर तर कमी होईलच; शिवाय खर्चातही बचत होईल, असा विश्वास सोळंकी यांनी व्यक्त केला. एक मेगावॅटमधून वीजेची १५ लाख युनिट्स निर्माण होऊ शकतात. एक शहरी कुटुंब दरवर्षी सरासरी एक ते दीड हजार युनिट्स वापरते. सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या खर्चात साधारणपणे अर्धी बचत होण्याची शक्यता आहे. सध्या तरी केवळ १ मेगावॅट वीजनिर्मितीचे आमचे लक्ष्य आहे. मात्र आयआयटी-मुंबईच्या प्रांगणात तब्बल २.५ मेगावॅट वीजेची निर्मिती करण्याची क्षमता आहे.
‘सध्या आपण एका युनिटवर ११ ते १२ रुपये खर्च करतो. पण, सौर ऊर्जेमुळे हा खर्च अध्र्यावर म्हणजे ५ ते ६ रुपयांवर येईल,’ अशी माहिती सोळंकी यांनी दिली. ज्या इमारतींवर पीव्ही पॅनेल्स ठेवण्यासाठी पुरेशी जागा आहे, अशा इमारती त्यासाठी निवडण्यात आल्या आहेत. मेकॅनिकल, सिव्हीक्स, फिजिक्स, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रीकल इंजिनिअरिग आदी विभागांच्या इमारतींवर पहिल्या टप्प्यात ही पॅनेल्स बसविण्यात येणरा आहेत. या प्रत्येक विभागाची विजेची गरज वेगळी आहे. पण, सौर ऊर्जेतून या प्रत्येक विभागाची विजेची गरज भागू शकेल, असा विश्वास आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा