आयआयटी मुंबईच्या ५५० एकरांमध्ये विखुरलेल्या संकुलाचा नकाशा आता आपल्याला मोबाइलमध्ये उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रथमच या संकुलात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस संकुलातील एखाद्या ठिकाणी जाणे अधिक सोपे होणार आहे.
आयआयटी मुंबईच्या संकुलामध्ये अनेक इमारती असून यात शैक्षणिक, प्रशासकीय, शिक्षकांचे निवासस्थान, विद्यार्थ्यांचे वस्तीगृह, प्रेक्षागृहे आदींचा समावेश आहे. संस्थेत विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेक विद्यार्थी प्रथमच येत असतात. अशावेळी त्यांची गडबड उडते आणि नेमके कुठे जायचे ते त्यांना समजत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी तसेच संकुलात राहात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरावा या उद्देशाने आयआयटीतील इंडस्ट्रीअल डिझाइन केंद्रातील प्राध्यापक मंदार राणे यांनी एक टू-डी नकाशा तयार केला आहे. या नकाशात संस्थेतील विविध ठिकाणे १२ विभागात विभागली आहेत. यामध्ये केवळ संस्थेतील विविध विभाग, प्रयोगशाळा आदींची माहितीच उपलब्ध नसून संकुलात असलेली रुग्णालये, बँक आदी गोष्टींची माहिती देण्यात आली आहे.
इंग्रजी आणि हिंदीतील हा नकाशा http://mrane.com/iitbmap.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ‘इंस्टीमॅप’ या अँड्रॉइड अ‍ॅपद्वारे मोबाइलवरही उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये ठिकाण शोधल्यावर तेथील रस्ता तर आपल्याला कळतोच; याचबरोबर तेथील संपर्क क्रमांकही मिळतो. आयआयटी संकुलामध्ये वावरण्यासाठी हे अ‍ॅप मार्गदर्शक ठरणारे असल्याचे प्रा. राणे यांनी सांगितले. भविष्यात या अ‍ॅपमध्ये संकुलातील दोन ठिकाणांमधील मार्ग दाखविण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा