हिरवाईने मोहरलेल्या, विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजलेल्या पवईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे वातावरण केवळ विद्यार्थ्यांच्या करिअरलाच नव्हे तर त्यांच्या जीवनाविषयीच्या दृष्टिकोनांनाही वेगळे वळण लावणारे ठरते आहे. कारण, सध्या इथे वास्तव्य करून शिकणारे विद्यार्थी दररोज कुटुंबाच्या संपर्कात राहून आपली कुटुंबाविषयीची जवळीक दाखवीत असले तरी भविष्यात मात्र कुटुंबापेक्षाही आपल्या मित्रांच्या सोबत राहणे अधिक पसंत करणार आहेत. कुटुंबात राहताना येणारी बंधने, पाळावे लागणारे नियम याचे दडपण नको असल्याने कदाचित येथील ४५ टक्के विद्यार्थ्यांना आयआयटीतून शिकून बाहेर पडल्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींच्या सहवासातच राहावेसे वाटते आहे. म्हणजेच आयआयटीतील हॉस्टेलवरचे दिवस कधीच संपू नयेत असे एका अर्थाने या विद्यार्थ्यांना वाटते. ‘इनसाइट’ या आयआयटीच्या अंतर्गत वर्तुळात प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या नियतकालिकासाठी विद्यार्थ्यांनीच एक पाहणी केली होती. त्यात विद्यार्थ्यांना हे व्यक्तिगत स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले होते.
mv01

Story img Loader