पवईची ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) म्हणजे गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या असे चित्र डोळ्यांसमोर येत असेल तर तो विचार बदलायला लागेल. कारण, राष्ट्रीय पातळीवर चुरशीची स्पर्धा करून या अग्रगण्य संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सामाजिक क्षेत्रही खुणावू लागले आहे. सामाजिक कार्याची आवड असलेल्या अशा आयआयटीयन्सनी पवईच्या संकुलात नुकत्याच भरविलेल्या ‘अभ्युदय’ या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप पाहिले तरी याचे प्रत्यंतर येईल. ‘समाजकार्य’ या विषयाकडे वेगळ्या आयामातून पाहण्याची दृष्टीही या वेळी आयआयटीयन्सनी दिली हे विशेष!
असे काय वेगळेपण होते या महोत्सवाचे? शनिवार-रविवार अशा दोन दिवस झालेल्या या महोत्सवाचा विषयच होता मुळात ‘समाजकार्य- तरुण आणि रोजगार’. समाजसेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्यांशी चर्चा, व्याख्याने, कार्यशाळा हे नेहमीचे कार्यक्रम तर यात होतेच. याशिवाय ‘सांस्कृतिक जत्रे’च्या माध्यमातून देशातील पारंपरिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे, स्वयंसेवी संस्थांच्या कामाची विद्यार्थ्यांना माहिती करून देणे असे उपक्रमही या वेळी राबविण्यात आले.
किंबहुना संपूर्ण महोत्सवात डोळ्याचे पारणे फेडणारा हा दर्शनसोहळा विद्यार्थ्यांची सर्वाधिक गर्दी खेचणारा ठरला. केरळमध्ये पारंपरिक पद्धतीने तयार केले जाणारे अरन्मुला आरसे, रोगन आर्ट म्हणून ३०० ते ४०० वर्षे जुन्या असलेल्या कलेचे नमुने, नादमधुर आवाज निर्माण करणाऱ्या कच्छमधील तांब्यांच्या घंटा, बस्तरमधील टेराकोटा, कुंचल्यांचा वापर न करता बोटांच्या नखांनी कागदाला वेगळा आकार देऊन रंगविणारे अनोखे नेल आर्ट, गोंद आदिवासींच्या विविध कला अशा कितीतरी पारंपरिक  कला, ज्या आता मृतवत होत चालल्या आहेत, त्यांना या ठिकाणी व्यासपीठ मिळवून देण्यात आले. रोगन आर्ट ही कला तर कच्छमधील निरोना या गावात केवळ एकाच कुटुंबामुळे टिकली आहे. गलवाणी झकारिया यांचे मातीच्या गोळ्यातून झटपट पुतळे साकारण्याचे कौशल्य पाहून येणारे-जाणारे आ वासूनच पाहत होते. याशिवाय अभ्युदयमध्ये अवंती, ग्रीनपीस, इंडिया फेलोज, गुंज, टिच फॉर इंडिया, त्रिनयनी यांसारख्या ३० स्वयंसेवी संस्थांची माहिती करून घेण्यामध्येही मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांनी आणि आयआयटी शिक्षकांनी रस दाखविला.
याशिवाय ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’मध्ये शिकूनही ‘साऊंड्स ऑफ सायलेन्स’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात तंत्रज्ञानाच्या आधारे बदल घडवून आणणारे सुमित सिंग गांधी, गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून सामाजिक कार्याला वाहून घेतलेले सुहानी मोहन आणि प्रत्युष राठोड हे आयआयटीचे माजी विद्यार्थी संवाद साधण्यासाठी उपस्थित होते. सुमित यांनी सामाजिक उद्योजिकतेविषयीचे मूलभूत धडे या वेळी विद्यार्थ्यांना दिले. तर शेखर कुलकर्णी यांनी ‘इम्पोर्ट सब्स्टिटय़ूशन इंजिनीअरिंग’ यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
जयपूर फूटचे संस्थापक डी. आर. मेहता यांनी जयपूर फूट म्हणजे गरिबांना स्वस्तात किंवा फुकटात उपलब्ध होणारा कृत्रिम पाय अशी जी काही समजूत आहे, ती खोडून काढली. आज जयपूर फूट हा देशविदेशातील प्रत्येक वर्गामध्ये स्वीकारला गेला आहे. कारण, सामाजिक सेवांनी आर्थिक आणि राष्ट्रीय सीमारेषा तोडण्याचे काम केले आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली.
ग्रामीण भागातील जनतेसाठी स्वच्छ पाण्याचा आग्रह धरून त्यासाठी संशोधनाच्या आधारे चळवळ उभारणाऱ्या ओरिसातील जो मेडियथ यांच्याशी बोलण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळाली. महोत्सवाचे हे दुसरेच वर्ष आहे. गेल्या वर्षी या महोत्सवाचे स्वरूप अत्यंत छोटे होते. परंतु, यंदा या महोत्सवाच्या आयोजनात विद्यार्थ्यांनी चांगलाच उत्साह दाखविल्याने दोन दिवस मोठय़ा प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करता येणे शक्य झाले, असे आयोजकांपैकी शंतनू हातकर या विद्यार्थ्यांने सांगितले.

Story img Loader