कामठीच्या आयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाबद्दल अनेक तक्रारी मिळाल्यामुळे अ.भा. तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) प्रतिनिधींनी नुकतीच या महाविद्यालयाची तपासणी केली. नागपूर विद्यापीठाच्या अखत्यारीतील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये किमान मूलभूत सोयींशिवाय सुरू असल्याचे सर्वानाच माहीत आहे. महाविद्यालयाच्या विरोधात तक्रार करणाऱ्या अधिव्याख्यात्यालाच व्यवस्थापनाने नंतर कामावरून कमी केले.
‘एआयसीटीई’च्या दक्षता पथकाने या महाविद्यालयात भेट देऊन प्रवेश आणि परवानगीसंबंधीच्या कागदपत्रांची पाहणी केली आणि काही कागदपत्रे सोबत नेली, असा दावा सूत्रांनी केला. एआयसीटीईच्या पथकाने या महाविद्यालयाला भेट दिल्याचे मुंबई येथील विभागीय अधिकारी ए.के. शुक्ला यांनी मान्य केले, परंतु ही ‘रुटीन व्हिजीट’ असल्याचे सांगून अधिक माहिती देण्यास नकार दिला.
एआयसीटीई नेहमीच अशारीतीने पाहणी करते आणि त्यात नवीन काहीच नाही, असे ते म्हणाले. या पाहणीचा अहवाल ‘गोपनीय’ असल्याचे सांगून त्याबाबत काही बोलण्यासही त्यांनी नकार दिला.
वर्धमान बहुउद्देशीय संस्थेतर्फे संचालित हे महाविद्यालय सुरू झाल्यानंतर दोन वर्षे तेथे आवश्यक त्या सोयी व सुविधा नव्हत्या. येथील विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक इतर महाविद्यालयांमध्ये घेण्यात आले. विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रमाणही महाविद्यालयाने राखलेले नाही. ही संस्था  मुंबईतील आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन्सचा भाग आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य जे.बी. हेलोंडे यांनीही एआयसीटीई चमूच्या पाहणीचे वर्णन ‘रुटीन’ असे केले आणि या अनियमिततांना तोंड फोडणाऱ्या शिक्षकाने केलेल्या तक्रारींचा याच्याशी काही संबंध नसल्याचे सांगितले. आमचे या भागातील सवरेत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय असून येथे सर्व सोयीसुविधा आहेत. एआयसीटीईची चमू अशी पाहणी अधूनमधून करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बडतर्फ करण्यात आलेल्या शिक्षकाने लावलेले अनियमितता आणि गैरव्यवस्थापन यांचे आरोप प्राचार्यानी ठामपणे नाकारले.
 या शिक्षकाला महाविद्यालयातून आधीच काढून टाकण्यात आले होते आणि बदला घेण्याच्या उद्देशाने तो या गोष्टी करीत आहे. त्याने केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. महाविद्यालयात काहीही अनियमितता नसून आमचे सर्व व्यवहार पूर्णपणे पारदर्शक आहेत. एखाद्याने आमच्यावर निराधार आरोप केले असतील, तर त्यांची पडताळणी करण्यासाठी आम्ही केव्हाही तयार आहोत, असेही हेलोंडे म्हणाले.