वीजदरवाढीला शासनात झालेले भ्रष्टाचार व गैरकृत्येच कारणीभूत आहेत. आधी कारभार सुधारा, भ्रष्टाचार बंद करा, खरेदी इमानदारीने करा आणि मगच ग्राहकांकडे पैसे मागा. ही अन्यायी दरवाढ तातडीने मागे न घेतल्यास जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल आणि हा रोष जनता रस्त्यावर उतरून व्यक्त करेल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी काल दिला.
महावितरण कंपनीने नुकत्याच केलेल्या अन्यायी वीजदरवाढीच्या निषेधार्थ काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने इचलकरंजीत प्रांत कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला. खासदार राजू शेट्टी, वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळा येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. प्रमुख मार्गावरून जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. प्रांत कार्यालय चौकात पोलिसांनी मोर्चा अडवला. त्यामुळे आंदोलकांनी त्याच ठिकाणी रस्त्यावर ठिय्या मारला आणि मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी जयकुमार कोले, रावसाहेब गुरव आदींची भाषणे झाली.
त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात विजेचे दर मोठय़ा प्रमाणात वाढले असून त्याचा विपरीत परिणाम यंत्रमागधारक व शेतकऱ्यांवर होत आहे. वीजदरवाढीमुळे वस्त्रोद्योग आणि शेती उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे लाखो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. महावितरण कंपनीचा खर्च हा अवाजवी, अकार्यक्षम व भ्रष्टाचार असल्याने हा अतिरिक्त खर्चाचा बोजा वीजग्राहकांवर लादता कामा नये. ही दरवाढ छोटय़ा उद्योगाचे, यंत्रमाग व्यवसायाचे व मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे. त्यामुळे ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी अशी मागणी करून दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे.
याप्रसंगी सावकार मादनाईक, भगवान काटे, उल्हास पाटील, अण्णासाहेब चौगुले, विजय भोसले, सुवर्णा अपराध, प्रमोद कदम, अरुण पाटील, नागेश पुजारी, सागर शंभुशेटे आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा