मनोरंजनाच्या मैदानावर विकास नियंत्रण नियमावलीनुसार समाकल्याण केंद्र अथवा अन्य बांधकाम करण्यास मान्यता नसतानाही महापालिकेच्या उच्चपदस्थांनी विकास नियमावली धाब्यावर बसवून घाटकोपर पश्चिम येथील माणिकलाल मनोरंजन मैदानावर काँग्रेसच्या एका नगरसेवकाच्या आग्रहापोटी समाजकल्याण केंद्र बांधण्यास मंजुरी दिली आहे. मनसेने ही बाब पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या प्रकरणी आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यामुळे आता ही मंजुरी रद्दबातल ठरविण्याचे काम सुरु झाले आहे.
माणिकलाल मैदान हे मनोरंजन मैदानासाठी आरक्षित असलेले मैदान असून बाळासाहेब ठाकरे, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी तसेच शरद पवार यांच्या सभा या मैदानावर झाल्या आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठीचे हे घाटकोपरमधील महत्त्वाचे मैदान आहे. ४२७१ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या मैदानावर २४.७ चौरस मीटर बांधकाम यापूर्वीच अस्तित्वात आहे. काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी या मैदानात समाजकल्याण केंद्र बांधण्याची मागणी केली आणि स्थानिक सहाय्यक आयुक्तांनी विकास नियंत्रण नियमावालीचा विचार न करता त्याला मंजुरी देऊन अतिरिक्त आयुक्त, पूर्व उपनगरे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठवून दिला.
स्थानिक नागरिकांनी तसेच येथील यंग स्पोर्ट्स क्लबसारख्या संस्थांनी मैदानावर समाजकल्याण केंद्र स्थापन करण्यास जोरदार विरोध केल्यानंतरही बांधकाम सुरू करण्यात आले असून स्थानिकांनी तसेच मनसेचे उपविभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी या विरोधात जोरदार आवाज उठवला. मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी एक शिष्ठमंडळाने पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना या अनधिकृत बांधकामाविरोधात निवेदन दिले तसेच विकास नियंत्रण नियमावलीला डावलून कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांनाही नसल्याचे लक्षात आणून दिले. खेळाची मैदाने तसेच मनोरंज मैदानांबाबत अद्यापि पालिकेचे धोरण तयार नाही आणि विकास नियंत्रण नियमावलीतही समाजकल्याण केंद्राला मंजुरी देता येत नसल्याचे आढळून आल्यामुळे आता ही मंजुरी रद्दबातल ठरविण्याचे काम सुरू झाल्याचे गणेश यांनी सांगितले.
मनोरंजनाच्या मैदानावर अनधिकृत समाजकल्याण केंद्र!
मनोरंजनाच्या मैदानावर विकास नियंत्रण नियमावलीनुसार समाकल्याण केंद्र अथवा अन्य बांधकाम करण्यास मान्यता नसतानाही महापालिकेच्या उच्चपदस्थांनी विकास नियमावली धाब्यावर बसवून घाटकोपर पश्चिम येथील माणिकलाल मनोरंजन मैदानावर काँग्रेसच्या एका नगरसेवकाच्या आग्रहापोटी समाजकल्याण केंद्र बांधण्यास मंजुरी दिली आहे.
First published on: 05-03-2014 at 07:47 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal center on playground in mumbai