कल्याणजवळील बल्याणी, मोहने, अटाळी, वडवली भागात भूमाफियांनी महापालिकेच्या आरक्षित तसेच सरकारी, वनजमिनीवर अनधिकृत चाळी, आरसीसी इमारतींची बिनधोकपणे बांधणी सुरु केल्याने कल्याणजवळील बल्याणी टेकडी जमिनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. बल्याणी टेकडी जमिनदोस्त करून याठिकाणी ३५० हून अधिक अनधिकृत चाळी भूमाफियांकडून उभारण्यात आल्या आहेत. आयुक्त शंकर भिसे यांच्या डोळ्यादेखत बेकायदा बांधकामांना पेव फुटल्याने या भागातील नागरिक हतबल झाले आहेत. 

बल्याणी टेकडीवर भूमाफियांनी ३५० अनधिकृत खोल्या बांधल्याचा अहवाल प्रमुख आरोग्य निरीक्षक सुनील जाधव यांनी तीन महिन्यापूर्वी ‘अ’ प्रभाग अधिकारी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या उपायुक्तांना दिला आहे. या अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली आहे. तरीही बल्याणी टेकडीवरील बेकायदा बांधकामांची उभारणी सुरुच आहे.
महापालिकेकडे स्थानिक रहिवाशांनी या बांधकामांच्या वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. भूमाफिया गुंड प्रवृत्तीचे असल्याने रहिवासी त्यांना घाबरून आहेत. त्यामुळे उघडपणे कोणी तक्रार करीत नाही. काही बांधकामांमध्ये स्थानिक नगरसेवकांचे हितसंबंध असल्याने प्रशासन या भूमाफियांवर कारवाई करण्यात टाळाटाळ करीत असल्याचे सांगण्यात येते. २६ भूमाफियांनी दहशतीच्या बळावर ही बांधकामे उभारली आहेत. वडवली येथे भास्कर शाळेमागे गौरी कन्स्ट्रक्शन यांनी सात माळ्याची अनधिकृत इमारत उभारली असल्याचे महापालिकेच्या अहवालात म्हटले आहे. अटाळी स्मशानभूमी येथे काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने तीन भूमाफियांनी ४८ खोल्यांची बांधकामे केल्याचा अहवाल महापालिका अधिकाऱ्यांनी सादर केला आहे. अशा प्रकारच्या चाळी, चार ते सहा मजली अनधिकृत बांधकामे मोहने येथे उभारण्यात आली आहेत. कल्याण तसेच आसपासच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी रहात असताना महापालिकेत यापैकी काही माफियांनी नियमीतपणे ‘भीशी’ सुरु केल्याची खमंग चर्चाही महापालिका वर्तुळात रंगली आहे. कल्याण परिसरातील अनेक टेकडय़ा जमिनदोस्त करुन यापुर्वी तेथे बेकायदा बांधकामे उभी राहीली आहेत. आता बल्याणी टेकडी कापण्याचे उद्योग सर्वाच्या डोळ्यादेखत सुरु असून महापालिकेचा अतिक्रमण विभाग मात्र हे सगळे उघडय़ा डोळ्यांनी पहात आहे.

Story img Loader