विकासाच्या माध्यमातून रग्गड पैसा कमविण्याच्या मोहात अडकलेल्या बिल्डरने भराव टाकून नाल्याचा मार्ग रोखल्याने मालाडमधील मालवणी गाव पावसाळ्यात जलमय होण्याची भीती आहे. भराव हटवून नाल्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी काही ग्रामस्थ प्रयत्न करीत आहे. मात्र भराव हटविण्यास बिल्डर तयार नाही, नाला वळविण्यासाठी शेजारचे जमीन मालक तयार नाहीत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मालवणीकरांना नव्याच संकटाला सामोरे जावे लागणार आहे. पालिकेकडे तक्रार करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
मालाडमधील मालवणी गावातून जाणाऱ्या छोटय़ा नाल्यातून पावसाच्या पाण्याचा निचरा होत होता. पाठीमागच्या बाजूने गावाबाहेर जाणारा हा छोटा नाला मोठय़ा नाल्याला जाऊन मिळत होता. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा मालवणी गावाला धोका नव्हता. परंतु गेल्या काही वर्षांपासून मालवणी गाव आणि जनकल्याण नगरच्या पाठीमागच्या बाजूला मोठय़ा प्रमाणावर टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. अशाच एका भूखंडावर इमारत बांधण्याचा विकासकाचा इरादा आहे. त्यासाठी त्याने मोठय़ा प्रमाणावर भरणी केली आहे. या इमारतीच्या आड मालवणी गावाबाहेर जाणारा नाला येत असल्यामुळे भराव टाकून त्याचा काही भाग बुजविण्याचा उपद्व्याप विकासकाने केला आहे. नाल्यात भरणी झाल्यामुळे पावसाचे पाणी पुढे मोठय़ा नाल्याला मिळूच शकणार नाही आणि त्यामुळे मालवणी गाव जलमय होण्याची भीती आहे. आपल्या भूखंडावर एका बाजूला गटारासाठी विकासकाने खोदकाम केले आहे. परंतु हे गटार गावातून बाहेर पडणाऱ्या नाल्याला जोडण्यात आलेले नाही. त्यामुळे पावसाचे  पाणी वाहून नेण्यासाठी त्याचा काहीच उपयोग होणार नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.भरणी केलेली माती हटवून नाल्याचा मार्ग पूर्ववत करण्यास विकासक तयार नाही. म्हणून काही ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन नाला वळवून मोठय़ा नाल्याला जोडण्याची कल्पना मांडली. परंतु नाला आपल्या भूखंडातून वळविण्यासाठी जमीन मालक तयार नाहीत. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. विकासकाने नाल्यामध्येच भरणी केल्याचे निदर्शनास आल्यामुळे काही ग्रामस्थांनी पालिकेच्या विभाग कार्यालयात याबाबत तक्रारही केली. सहायक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी काही दिवसांपूर्वी या नाल्याची पाहणीही केली. यानंतर नाल्याचा मार्ग मोकळा होईल, असे ग्रामस्थांना वाटले होते. परंतु अद्याप परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. या संदर्भात स्थानिक आमदार योगेश सागर, नगरसेवक अजित भंडारी यांच्याकडे ग्रामस्थांनी धाव घेतली होती. परंतु या मंडळींनीही हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. पावसाळा तोंडावर आल्यामुळे तातडीने नाल्याचा मार्ग मोकळा करणे गरजेचे आहे अन्यथा साचणाऱ्या पावसाच्या पाण्यात आम्ही आंदोलनाला बसू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.