‘एमआयडीसी’तील डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे मुख्यालय असलेल्या इमारती शेजारील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मोकळ्या भूखंडावर पुन्हा टपऱ्या व फेरीवाल्यांनी बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे. हा मोकळा भूखंड फेरीवाल्यांच्या ताब्यात जाण्याऐवजी तेथे उद्यान विकसित करण्यासाठी बँकेच्या ताब्यात देण्यात यावा, अशी मागणी बँकेचे सरव्यवस्थापक गोपाळ परांजपे यांनी एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून ‘डीएनएस’ बँकेच्या शेजारी असलेल्या या भूखंडावर भूमाफियांनी टपऱ्या, वर्कशॉप सुरू करून भूखंड बळकावण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी ही गंभीर बाब एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या गेल्या वर्षी निदर्शनास आणल्यानंतर एमआयडीसीने कारवाई करून पोलीस बंदोबस्तात भूखंडावर असलेली अनधिकृत बांधकामे तोडली होती. त्यानंतर डोंबिवली नागरी सहकारी बँकेने एमआयडीसीला पत्र देऊन बँकेशेजारी असलेला संबंधित रिकामा भूखंड बँकेला उद्यान विकसित करण्यासाठी द्यावा जेणेकरून त्या भूखंडाचे संरक्षण होईल असे कळवले होते. ही बांधकामे पाडताना काही ग्रामस्थांनी हरकत घेऊन या भूखंडाचा विकास ग्रामपंचायत करेल, अशी भूमिका घेऊन बँकेला हा भूखंड देण्यास मोडता घातला होता.
आता पुन्हा या भूखंडाला टपऱ्यांचा विळखा पडत चालला आहे. भूखंडावर रानटी झुडपे वाढत चालली आहेत. या मोकळ्या भूखंडाचा ताबा बँकेच्या ताब्यात दिल्यास त्याचे संरक्षण होईल, असे बँकेतर्फे एमआयडीसीला कळवण्यात आले आहे. भूखंडाचा ताबा देण्याचे अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांना नसतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘एमआयडीसी’तील भूखंडाला पुन्हा टपऱ्यांचा विळखा
एमआयडीसी’तील डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे मुख्यालय असलेल्या इमारती शेजारील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मोकळ्या भूखंडावर पुन्हा टपऱ्या व फेरीवाल्यांनी बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे.
First published on: 10-09-2014 at 07:11 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal constructions in dombivli