दिवाळी आणि फटाके याचे अतूट नाते असले तरी शहरात विविध भागात वर्दळीच्या ठिकाणी अनेक फटाके विक्रेत्यांनी नियम डावलून दुकाने थाटली असून त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नागपूर शहरात हजार-बाराशेच्या आसपास फटाक्याची दुकाने थाटली असताना महापालिकेकडे अवघ्या ५३० दुकानांची अधिकृत नोंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
दिवाळीच्या पंधरा ते वीस दिवस शहरातील विविध भागात फटाक्यांची दुकाने थाटली जात असून त्यांना महापालिकेतर्फे रितसर परवानगी दिली जाते. फटाक्याच्या दुकानामुळे गेल्या काही वर्षांत लागलेल्या आगीमुळे ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी दुकानांसाठी जागा दिली जाते.तुळशीबाग, उत्तर नागपुरात इंदोरा चौकातील मैदानात, पश्चिम नागपुरात जयताळा परिसरात मध्य नागपुरात गांधीबाग परिसरातील मोकळ्या जागेत दुकाने थाटण्यासाठी परवानगी दिली होती मात्र शहरातील फटाके विक्रेत्यांची संख्या बघता अनेकांनी मिळेल त्या जागी दुकाने थाटली आहे.
अनेकांनी महापालिकेची परवानगी न घेता महाल, गांधीबाग, सक्करदरा, लक्ष्मीभवन, गोकुळपेठ, इतवारी अशा वर्दळीच्या ठिकाणी दुकाने थाटली आहे. नोंदणी करणाऱ्या दुकानदारांना व्यवसायाचा परवाना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवर मोठय़ा प्रमाणात फटाक्याची दुकाने लावण्यात आली असून त्या दुकानांच्या आजूबाजूला कपडय़ांसहित फर्निचर, औषधांची दुकाने आहेत. सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील अनेक फटाके विक्रेत्यांकडून वर्षभर फटाक्यांची विक्री केली जात असली तरी काही दुकानदारांनी मात्र खास दिवाळीनिमित्त दुकाने थाटली आहेत.
बडकस चौक ते इतवारीकडे जाणाऱ्या वर्दळीच्या मार्गावर अनेक फटाके विक्रेत्यांनी दुकाने लावली असून त्यातील अनेकांनी महापालिकेची रितसर परवानगी घेतली नसल्याची माहिती मिळाली. तुळशीबाग परिसरात फटाके विक्रेत्यांसाठी जागा देण्यात आली आहे मात्र त्या तेथील जागा अपुरी असल्यामुळे अनेक दुकानदार जागा शोधण्यासाठी वणवण फिरत आहे. त्यांना जागा नसल्यामुळे वस्तींमध्ये दुकाने थाटली आहेत. अशा फटाके विक्रेत्यांवर ना महापालिकेचे ना आरोग्य विभागाचे लक्ष आहे. काही फटाके विक्रेत्यांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, वर्दळीच्या ठिकाणी फटाक्याची दुकाने लावण्यावर बंधने आणली असली तरी पर्यायी जागा मात्र महापालिका उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे मिळेल त्या जागेवर दुकाने थाटून व्यवसाय करावा लागतो. गेल्या काही वर्षांत विदर्भात फटाक्याची बाजारपेठ मोठय़ा प्रमाणात वाढली असून जवळपास १०० कोटींच्या जवळपास उलाढाल होत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. गेल्यावर्षीच्या तुलनेने यावर्षी फटाक्यांच्या किमतीत यंदा २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून यावेळी आवाजी फटाक्यापेक्षा व शोभीवंत फटाक्याची मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
एकीकडे महागाई वाढली असली लोकांची फटाके फोडण्याची हौस मात्र कमी होत नाही त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून गांधीबाग मार्केटमधील फटाक्याच्या दुकानात ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. यावेळी ५० डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या फटाक्याच्या निर्मितीवर बंदी आणल्यामुळे लक्ष्मीबॉम्ब आणि सुतळी बॉम्बच्या विक्रीवर परिणाम झाल्याचे सांगितले. महापालिकेच्या गांधीबाग झोनचे अतिरिक्त उप आयुक्त पवार म्हणाले, फटाके विक्रेत्यांसाठी महापालिकेने काही ठराविक भागात जागा उपलब्ध करून दिली असून ज्यांना फटाके विक्रीचा परवाना दिला आहे त्यांनाच त्या ठिकाणी दुकाने लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. लवकरच वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या फटाके विक्रेत्यांकडे परवाना आहे, याची चौकशी केली जाणार असून त्यानंतर कारवाई केली जाईल असेही पवार यांनी सांगितले.

Story img Loader