नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत अनधिकृत होर्डिग्ज, बॅनर, फलक, भित्तिपत्रके यांचे प्रमाण दिवसेंदिवस लक्षणीय वाढत असून, या बॅनरबाजीमुळे शहर विद्रूप होण्यास हातभार लागत आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी हजारो फलक लागलेले असताना पालिका प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे चित्र आहे. आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी चार दिवसांपूर्वी अनधिकृत होर्डिग्ज हटविण्याचे आदेश देऊनही परस्थिती जैसे थे असून, याला सर्वस्वी आठ प्रभाग अधिकारी व पालिकेचा अतिक्रमण विभाग कारणीभूत असल्याचे स्पष्ट दिसून येते.
शहरात ८३५ होर्डिग्ज अनधिकृत रीत्या लावण्यात आल्या असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. शहर विद्रूपीकरणाला कारणीभूत असणाऱ्या बॅनरबाजीवर मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे मध्यंतरी काही काळ मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागात बॅनरबाजीचे प्रमाण कमी झाले होते. पण मुंबई, नवी मुंबईत लोकसभा निवडणुका संपल्यानंतर बॅनरबाजीला पुन्हा ऊत आला असून, या अनधिकृत बॅनरबाजीला स्थानिक प्रभाग अधिकारी कारणीभूत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
नवी मुंबईतील आठ प्रभागात एकही प्रभाग अधिकारी असा नाही जो हे जागोजागी लागलेले अनधिकृत होर्डिग्ज, बॅनर, फलक हटविण्याची हिम्मत करू शकतो. बहुतांशी सर्व प्रभाग अधिकारी राजकीय दबाव व निवृत्तीचे वेध लागलेले आहेत. त्यामुळे गल्लीतील फुटकळ कार्यकर्तादेखील आपल्या मोठय़ा नेत्यांची फोटो छापून भाव खात असल्याने ऊठसूट कोणीही बॅनरबाजी करीत असल्याचे दिसून येते. त्यात परवानगी घेऊन बॅनर लावणे म्हणजे नसती आफत असल्यासारखे वाटत असल्याने विनापरवानगी बॅनर लावण्याकडे जास्त कल आहे. नवी मुंबई पालिकेच्या मुख्यालयातून रीतसर परवानगी घेऊन लावलेले कायमस्वरूपी होर्डिग्ज मागील सहा महिन्यांत केवळ ३६ आहेत. प्रभाग अधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन बॅनरबाजी करणाऱ्यांचे प्रमाण अंत्यत कमी आहे. त्यामुळे पालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्नदेखील बुडत आहे. तरीही त्याची फिकीर पालिकेला नाही. अनधिकृत बॅनर हटविण्याची जबाबदारी प्रभाग व अतिक्रमण विभागाची आहे, पण ही कारवाई करायला या अधिकाऱ्यांचे हात धजावत नसल्याचे दिसून येते. म्हणूनच सीबीडी सर्कल, नेरुळ सर्कल, वाशी अरेंजा कॉनर्र, कोपरखैरणे सर्कल, ऐरोली येथील सेक्टर पाचचा भाग तसेच सर्व रेल्वे स्थानकांबाहेरील ठिकाणे अनधिकृत बॅनरबाजीने व्यापून गेली असल्याचे दिसून येते.
फलकबाजीचा महापूर
नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत अनधिकृत होर्डिग्ज, बॅनर, फलक, भित्तिपत्रके यांचे प्रमाण दिवसेंदिवस लक्षणीय वाढत असून, या बॅनरबाजीमुळे शहर विद्रूप होण्यास हातभार लागत आहे.
First published on: 11-07-2014 at 01:37 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal hoarding flood in navi mumbai city