सिंह्स्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी विविध संस्था व संघटना आक्रमक झाल्या असताना शहरातील अवैध फलकबाजीचे प्रदूषण हटविण्यासाठी मात्र असे प्रयत्न होताना दिसत नाहीत. न्यायालयाच्या चपराकीनंतर काही दिवस फलकबाजीविरोधात कारवाई करणारी महापालिका या विषयावर आता थंड झाल्याने शहरात पुन्हा एकदा अवैध फलकबाजीचे पेव फुटले आहे. सिंहस्थातही स्थिती अशीच कायम राहिल्यास संपूर्ण देशातून येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसमोर ‘सुंदर नाशिक’ऐवजी ‘विद्रूप नाशिक’चा चेहरा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कुंभमेळ्यासाटी विकास कामांना गती मिळावी म्हणून एकिकडे स्थानिक प्रशासनाच्या बैठकांवर बैठकांचा रतीब सुरू असून शाही स्थान गोदावरीत होणार असल्याने गोदावरी जल प्रदूषणाचा विषय चर्चेत आहे. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्यासह अनेक साधु, महंतांनी गोदावरी पात्राची पाहणी केल्यावर अशा पाण्यात स्नान करणे धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले आहे. गोदापात्र प्रदूषणुक्त न केल्यास शाही स्नानावर बहिष्काराचा इशाराही साधु-महंतांनी दिला होता. अशी परिस्थिती असताना पुरोहित संघ, नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राशी संबंधित निमा, आयमा यांसारख्या संघटनांनी थेट रामकुंडाजवळ निदर्शने करत गोदावरी प्रदूषणुक्त करण्याची मागणी केली. गोदावरी प्रदूषणुक्त करण्यासाठी एवढी धडपड सुरू असताना दुसरीकडे ज्या नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे, त्या नाशिकचे सौंदर्य खुलविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील रस्त्यांची दुरूस्ती आणि डांबरीकरणाचे काम सध्या सर्वत्र केले जात असले तरी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अवैध फलकांविरोधात कारवाई करण्यात महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि पोलीस यांच्या वतीने बोटचेपी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
काही महिन्यांपूर्वी शहरातील प्रत्येक चौक आणि रस्त्यास अवैध फलकबाजीने घेरले होते. पालिकेकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने अशी फलकबाजी करणाऱ्यांची हिंमत इतकी वाढली होती की, अगदी सिग्नलच्या खांबावर, वाहतूक बेटांवर, दुभाजकांमध्ये, महामार्गालगत फलक झळकू लागले होते. या फलकांमुळे अनेक ठिकाणी विशेषत: चौकांमध्ये वाहनधारकांना अपघातांना सामोरे जावे लागण्याचे प्रकार घडले. संपूर्ण शहर फलकांनी व्यापून आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या आणि स्वत:ला भाऊ, दादा, अण्णा संबोधून घेणाऱ्यांनी तर शहराचे सौंदर्यीकरण कसे काळवंडेल, याचीच काळजी घेतली. असे फलक ताब्यात घेऊन त्यांच्याविरूध्द दंड करण्याची हिंमत ना महापालिकेने दाखवली ना पोलिसांनी. अखेर न्यायालयानेच जेव्हा अवैध फलकबाजीविरोधात फटकारले, तेव्हा पालिका आणि पोलिसांना अचानक जाग आली. असे फलक ताबडतोब हटविण्यास सुरूवात झाली. एका आमदार पुत्राविरोधात यासंदर्भात गुन्हाही दाखल झाला. त्यामुळे किमान सिंहस्थापर्यंत नाशिकला लागलेले अवैध फलकबाजीचे ग्रहण सुटण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत असताना अलीकडे पुन्हा एकदा हळूहळू अवैध फलकबाजीने पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. इंदिरानगर, पाथर्डी फाटा, सिडको, अंबड, पंचवटीत निमाणी, नवीन आडगाव नाका, के. के. वाघ महाविद्यालय, अमृतधाम चौफुली, हनुमानगर, जत्रा हॉटेल चौफुली, या ठिकाणांवर असे अवैध फलक अधिक प्रमाणावर दिसून येतात. अवैध फलक गुंडगिरीस कारणीभूत ठरत असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा येत आहे. फलकबाजीच्या या प्रदूषणामुळे नाशिक शहराच्या सौंदर्यीकरणास बाधा येत असल्याने ते त्वरीत दूर करण्याची गरज व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा