कल्याण-डोंबिवली शहरात १४ टक्के पाणी कपात लागू करण्यात आल्याने शहराच्या चोहोबाजूने मोठय़ा प्रमाणात उभी राहाणारी अनधिकृत बांधकामे, नव्याने उभ्या राहाणाऱ्या इमारती तसेच चाळींमधून होणारा पाण्याचा चोरटा वापर रोखण्याचे मोठे आव्हान महापालिकेस पेलावे लागणार असून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी या अनधिकृत बांधकामांमधून सुरू असल्याने पाण्याचे नियोजन करताना पाणीपुरवठा विभागाची कसोटी लागेल, असे चित्र दिसू लागले आहे.
दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीतील महापालिकेच्या ‘ह’ प्रभागात अभियंते, बोगस प्लम्बर, होलमन, दलाल यांच्या संगनमताने तब्बल ९८ बोगस नळजोडण्या देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. अनधिकृत चाळी, इमारतींना सरसकट अशा प्रकारे जोडण्या देण्यात येत असल्याने अधिकृत जोडण्या घेणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. कल्याण, डोंबिवली अशा दोन्ही शहरांमध्ये पाण्याच्या अनधिकृत जोडण्या घेण्याचे प्रकार अगदी सर्रासपणे सुरु आहेत. टिटवाळा-मांडा, कल्याण पूर्व आणि डोंबिवली पश्चिमेत पाणी चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे या भागात अधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या, प्रामाणिकपणे करभरणा करणाऱ्या नागरिकांना नाहक पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. शहराचे झपाटय़ाने नागरीकरण होत असून मोकळ्या, पडिक जागांमध्ये मोठाली संकुले जोमाने उभी करण्यात येत आहेत. या बांधकामांसाठी विकासकांकडून स्वत:हून पाण्याची सोय करण्यात येत असली तरी हे पाणी कल्याण, डोंबिवली शहरातील नदी, कुपनलिका तसेच भूगर्भातूनच उपसले जात आहे. या बांधकामांना पालिकेने परवागनी दिली असल्याने पालिकेचा पाणीपुरवठा विभाग या विस्तारित इमारतींना पिण्याच्या पाण्याच्या सोयी तत्पर उपलब्ध करून देतात.
’ डोंबिवलीत मोठागाव, गरीबाचापाडा, नवापाडा, कुंभारखाणपाडा, देवीचापाडा, आयरेगाव, कोपर पूर्व रेल्वे स्टेशन, कल्याणमध्ये काटेमानिवली, कोळसेवाडी, खडवली, टिटवाळा भागांत जुनी कौलारू घरे तोडून तेथे तीन ते सहा-सात माळ्यांच्या इमारती उभारण्याची अक्षरश अहमहमिका लागली आहे. या अनधिकृत बांधकामांकडे महापालिकेची अक्षरश डोळेझाक सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा