श्री महालक्ष्मीच्या पूजा साहित्याच्या दुरूपयोगाबद्दल सोमवारी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी राजवाडा पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दोन श्रीपूजक व दोन स्टॉल विक्रेते यांच्यावर संगनमताने पूजा साहित्याची गैरविक्री करून भाविकांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे, तर तानाजी नारायण काटकर व नंदा शिवाजी तोरस्कर या स्टॉल विक्रेत्यांना अटक केली आहे. विलास जोशी व मंदार मुनीश्वर या श्रीपूजकांवरही गुन्हा दाखल झाला असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.    
शिवसेनेच्या वतीने सोमवारी महालक्ष्मी मंदिरात प्राथमिक सुविधांचा उडालेला बोजवारा जनतेसमोर आणण्यासाठी लोकआंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांना भाविकांकडून मंदिरात चालणाऱ्या फसवणुकीची माहिती देण्यात आली. भाविकांना कशाप्रकारे लुबाडले जात आहे, हे सविस्तर सांगण्यात आले. देवीला अर्पण करण्यात आलेल्या ओटीचे साहित्य पुन्हा स्टॉल विक्रेत्यांना दिले जाते. तेच साहित्य विक्रेते पुन्हा भाविकांच्या गळ्यात कशाप्रकारे मारतात हे सविस्तर सांगण्यात आले.    
यानंतर जिल्हाप्रमुख पवार व शिवसैनिकांनी राजवाडा पोलिसात धाव घेतली. तेथे पवार यांनी दोघे श्रीपूजक व दोघा स्टॉल विक्रेत्यांचा नामोल्लेख करून त्यांच्याकडून संगनमताने भाविकांना लुबाडले जात असून कारवाई करावी, अशी मागणी केली. पोलिसांनी चौघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.