पर्यावरणीय मान्यता मिळाल्याखेरीज देशभरातील कोणत्याही नदीघाटांवर वाळू उत्खनन करण्यावर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने कठोर र्निबध घातले असताना विदर्भातील अनेक नदीघाटांवर सर्रासपणे बेकायदा वाळू उपसा केला जात असल्याचे अमरावती जिल्ह्य़ातील घटनेने उघडकीस आले आहे. अमरावती जिल्ह्य़ातील महसूल यंत्रणेने तीन ठिकाणी कारवाई करून विना परवाना वाळू वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर्स पकडले.
अवैध वाळू उपश्यामुळे सर्वच भागातील नद्यांना धोका निर्माण झाला असून पर्यावरण संतुलनाचे परिणाम आता लक्षात येऊ लागले आहेत. केदारनाथचा प्रलय अशाच नदीघाटांवरील अवैध वाळू उपश्यांचा परिपाक होता. त्यामुळे नॅशन ग्रीन ट्रिब्युनलने गेल्या ५ ऑगस्ट वाळूच्या उत्खननावर र्निबध घातले होते. सर्वोच्च न्यायालयानेही वाळू उपश्याबद्दल यापूर्वी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या पाश्र्वभूमीवर अमरावती जिल्ह्य़ातील कारवाई हिमनगाचे एक टोक असल्याचे पर्यावरणवाद्यांनी म्हटले आहे. अमरावतीच नव्हे तर नद्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असलेल्या भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपुरातही वाळू उपसा सुरू असून सरकारी यंत्रणा मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याने नद्यांचे प्रवाह अन्य मार्गाने वळण्याचे धोके उद्भवू लागले आहेत तरच जैववैविध्यही आचके देत आहे.
अनेक जिल्ह्य़ांना यंदा पुराचा तडाखा बसला आता पूर ओसरल्यानंतर मुक्त झालेली वाळू हस्तगत करण्यासाठी तस्कर सरसावले आहेत. सुटीच्या दिवशी कारवाई होत नसल्याचे पाहून हे दिवस तस्करांसाठी पर्वणीच ठरू लागले आहेत. रेती घाटांच्या व्यतिरिक्त नवीन ठिकाणे शोधून वाळूचे उत्खनन करणे हा या तस्करांचा उद्योग आहे. सध्या बांधकामासाठी रेतीची मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. रेतीचे दरही वाढलेले आहेत. अवैधरित्या उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवण्यासोबतच चढय़ा दराने रेती विकण्याच्या या उद्योगाला यंत्रणांमधील काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांचाही हातभार असल्याने तस्करांचे बळ वाढले आहे.
अमरावतीत तर सुटीच्या दिवशी वाळू म्हणजे तस्करांसाठी ‘फ्री सेल’ झाला आहे. अनेक भागात यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याने वाळूचा प्रचंड उपसा सुरू आहे. धारणीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे आणि कर्मचाऱ्यांनी रविवारी अचानक धारणीजवळच्या उतावली येथे सिपना नदीकाठी छापा घातला तेव्हा चार ट्रॅक्टर्समध्ये अवैधरीत्या वाळू भरली जात होती. तहसीलदारांच्या आदेशावरून हे चारही ट्रॅक्टर्स जप्त करण्यात आले. सिपना नदीचा काठ आता तस्करांसाठी खुला झाला असून अनेक भागात विनापरवाना वाळूचा उपसा आणि वाहतूक सुरू आहे. धामणगाव ते परसोडी मार्गावर महसूल यंत्रणेने केलेल्या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करताना एक ट्रॅक्टर दिसून आला. संजय मांडवगणे यांच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी शिवपाल पाटणे (४५, रा. पुलगाव) आणि त्याच्या सहकाऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. कारवाईदरम्यान ट्रॅक्टरमालक पळून गेला. भंडाऱ्यातील वैनगंगेच्या बारीक वाळूला अधिक मागणी असल्याने, तसेच या व्यवसायात स्पर्धा वाढल्यामुळे घाटांच्या लिलावातून कोटय़वधी रुपयांची उलाढाल असून याकडे मोठय़ा प्रमाणात लोक वळू लागले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा