विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनासाठी सरकारकडून उपलब्ध केलेल्या शालेय पोषण आहाराच्या साहित्याचा नळदुर्ग शहरातील उर्दू शाळेत अनधिकृत साठा केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. पोलिसांनी या शाळेवर छापा टाकून सव्वालाख रुपयांचा माल जप्त केला.
नळदुर्ग शहरातील सय्यद अब्दुलाशहा उर्दू शाळेत ही कारवाई करण्यात आली. शाळेला शिक्षण विभागाकडून पुरविलेले पोषण आहाराचे साहित्य अनधिकृतपणे साठविण्यात आल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने तुळजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे यांना दूरध्वनीवर दिली होती. घारगे यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक बी. एम. शेख, हवालदार अमोल गणेश व गणेश इंगळे यांनी या शाळेत छापा टाकला. कारवाईत ७०० क्विंटल तांदूळ, दीड क्विंटल मूगडाळ, ७० किलो मटकी, ३३ किलो तूरडाळ, ३१ किलो हळद, २३ किलो जिरे, ४५ किलो मोहरी, २४२ किलो मिरची व मिठाची पाकिटे आदी साहित्य साठवून ठेवल्याचे आढळून आले. शाळेतील खोलीत ठेवलेल्या साहित्याची पाहणी केल्यानंतर हे साहित्य शालेय पोषण आहाराचेच असल्याचे स्पष्ट झाले. परंतु या प्रकरणी कारवाईचे आदेश पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना असल्याने पोलिसांनी गटविकास अधिकारी तृप्ती ढेरे यांना माहिती दिली. ढेरे यांनी शालेय पोषण आहार विभागाचे अधीक्षक एस. आर. गुरव यांना घटनास्थळी पाचारण केले. गुरव यांच्यासह विस्तार अधिकारी जी. एन. गर्जे यांनी या शाळेच्या आवारातील पाच खोल्यांत अनधिकृत साठवून ठेवलेले पोषण आहाराचे साहित्य जप्त केले. जप्त केलेले हे साहित्य २०१० ते २०१३ या कालावधीधील असल्याचे सांगितले जाते.
केंद्राने शालेय विद्यार्थ्यांसाठी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनाची योजना सुरू केली. योजनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली. मात्र, अलीकडच्या काळात या योजनेला हरताळ फासण्याचेच काम शाळेचे मुख्याध्यापक तसेच काही संस्थाचालकांकडून केले जात आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याऐवजी सरकारकडून मिळालेल्या पोषण आहाराचे साहित्य विकून पसा कमविण्याचा धंदा काही मुख्याध्यापक व संस्थाचालक करीत असल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले. विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास पळविणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.
सामाजिक कार्यकत्रे अजहर जहागिरदार यांच्यामुळे नळदुर्गच्या उर्दू शाळेतील पोषण आहाराचा घोटाळा समोर आला. वास्तविक, नियमानुसार कोणत्याच शाळेत पोषण आहाराचे साहित्य दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ साठवून ठेवता येत नाही. असे असतानाही या शाळेच्या मुख्याध्यापकांनी मागील अनेक महिने नियम धाब्यावर बसवत पोषण आहाराचे साहित्य साठवून ठेवले. साठवून ठेवलेल्या साहित्यापकी तांदळाची १५६ पोती अतिशय घाणीत असल्याचे दिसून आली. सर्व साहित्याचा पंचनामा करून तुळजापूर पंचायत समिती पोषण आहार विभागाचे अधीक्षक गुरव, विस्तार अधिकारी एस. आर. नागमोडे यांनी ते जप्त केले. जप्त साहित्याची किंमत १ लाख ८ हजार ३८६ रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा