दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवरील कॉपीसारख्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्याकरिता ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’मार्फत पाठविल्या जाणाऱ्या ‘भरारी पथकां’च्या आडून भलतेच शिक्षक शाळांमध्ये हजेरी लावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुख्य म्हणजे मुंबई विभागीय मंडळाच्या एका सदस्याच्याच हा गैरप्रकार निदर्शनास आल्याने त्यांनी या प्रकाराची लेखी तक्रार मंडळाकडे केली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा पेपरफुटी, कॉपी, डमी विद्यार्थी यांसारख्या गैरप्रकारांनी गाजत असतानाच बोगस शिक्षकांच्या या ‘भराऱ्यां’मागे नेमके काय गौडबंगाल आहे, असावे असा प्रश्न आता विभागीय शिक्षण मंडळाला पडला आहे.
जोगेश्वरीच्या ‘हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल’चे शिक्षक आत्माराम नरे हे मुंबई विभागीय मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मंडळाचे सदस्य म्हणून त्यांची ‘भरारी पथका’त नियुक्ती करण्यात आली. परीक्षा काळात गैरप्रकार होऊ नये यासाठी या भरारी पथकांकडे अचानक केंद्रांना भेट देऊन पाहणी करण्याची जबाबदारी असते. मंडळाच्या भरारी पथकामार्फत नरे यांनी जोगेश्वरीतील बालविकास विद्या मंदिर आर.जे.एम.डी.एस. इंग्लिश स्कूल या ठिकाणी ७ मार्च रोजी भेट दिली. परंतु, या शाळांमध्ये जोगेश्वरीच्याच श्रमिक विद्यालय या शाळेतील शिक्षिका श्रीमती चव्हाण यांनी भरारी पथक सदस्य म्हणून भेट दिल्याचे त्यांना सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर शाळेमध्ये असलेल्या मंडळाच्या अभिप्राय पुस्तिकेत तशी नोंदही करण्यात आली होती. बालविकास मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका नीला वर्तक यांनी ही बाब नरे यांच्या निदर्शनास आणून दिली.
चव्हाण यांची नियुक्ती भरारी पथकात करण्यात आली होती का, याची खातरजमा करण्यासाठी नरे यांनी जोगेश्वरी येथील शिक्षण निरीक्षक कार्यालयाचे प्रभारी शिक्षण अधिकारी राजेश कंकाल यांच्याकडे चौकशी केली. कंकाल यांनी शिक्षण विभागातर्फे चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर नरे यांनी मुंबई विभागीय मंडळाचे सचिव सि.या.चांदेकर यांच्याकडे लेखी तक्रार केली.
नरे यांची तक्रार आल्याचे चांदेकर यांनी स्पष्ट केले. तसेच, नरे यांच्या तक्रारीवरून या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश आपण जोगेश्वरीच्या शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती चांदेकर यांनी दिली. ‘चव्हाण यांचा भरारी पथकात समावेश नव्हता. मात्र, चौकशीनंतर जो काही अहवाल येईल त्यावर आपण संबंधितांवर काय कारवाई करायची याचा निर्णय घेऊ,’ असे चांदेकर यांनी स्पष्ट केले.
बारावीच्या परीक्षेदरम्यान ‘व्हॉट्सअप’वरून पेपरफुटीचा प्रकार नुकताच सामोरा आला आहे. त्यातून कॉपीचे प्रमाण तर मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्येही लक्षणीय आहे. अशातच एका केंद्रावर मान्यता नसतानाही भरारी पथक म्हणून भेट देण्याचा हा प्रकार गंभीर आहे. मंडळाच्या सदस्याच्या जागरूकतेमुळे हे प्रकार समोर तरी आला. पण, इतर केंद्रांवर अशा किती बोगस ‘भराऱ्या’ मारल्या जात असतील, हे अजून गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे, या प्रकाराकडे मंडळाने गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्ष व्यक्त होते आहे.

Story img Loader