कायदा धाब्यावर बसवून चार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना परवानगी दिल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी जितेंद्र खंडागळे व शिवाजी चंदनशिवे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अन्य दोघा कर्मचाऱ्यांविरुद्ध दोषारोपपत्र बजावण्यात आले आहे. सुषमा वायबसे (रत्नागिरी), शशिकला भगत (ठाणे), लक्ष्मण कोळी व संतोष गोब्बूर (दोघे कोल्हापूर) या चार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना जागा रिक्त नसताना परवानगी दिल्याचा ठपका उपशिक्षणाधिकारी खंडागळे व चंदनशिंवे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आंतरजिल्हा बदल्यांना परवानगी दिली त्या वेळी हे दोघे जण प्रभारी शिक्षणाधिकारी होते. या दोघांना दहा दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर बी. सी. बनसोडे व निर्मला राठोड हे दोघे लिपिकही चौकशीत दोषी आढळून आले आहेत. त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
नियम धाब्यावर बसवून चार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना परवानगी देताना तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांना ‘लक्ष्मीदर्शन’ घडविण्यात आले होते. त्याबाबतची तक्रार जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते संजय पाटील यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन चौकशी झाली असता त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर ही कारवाई हाती घेण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा