डोंबिवलीत व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे. ती नियमबाह्य़ आहे. व्हॅन चालकांना विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. कल्याणमध्ये अशा प्रकारे वाहतूक करणाऱ्या २२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. डोंबिवली, उल्हासनगरमध्ये अशा प्रकारची कारवाई सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनायक गुजराथी यांनी दिली.
व्हॅनमध्ये १५ ते २० विद्यार्थी कोंबून डोंबिवलीत अनेक ठिकाणी बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. काही शाळाचालकांनी याबाबत तक्रारी केल्या असून अशा प्रकारे व्हॅनमधून ने-आण करताना विद्यार्थ्यांना अपघात झाल्यास त्याची जबाबदारी आम्ही घेणार नाही, अशी भूमिका काही शाळांच्या व्यवस्थापनांनी घेतली आहे. दरम्यान, परिवहन विभागाच्या डोळ्यादेखत अशा प्रकारे बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
डोंबिवली परिसरातइंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्वत:च्या बसेस आहेत. या बसमधून संबंधित शाळांचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांची ने-आण करतात. उपप्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक विभाग यांनी विद्यार्थी वाहतुकीसाठी आखलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन या शाळा करत असतात. असे असताना काही शाळांच्या व्यवस्थापनांनी विद्यार्थी वाहतुकीसाठी व्हॅन खरेदी केल्या आहेत. या व्हॅनला आरटीओकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. या व्हॅन चालविण्यासाठी आरटीओची परवानगी आवश्यक आहे. व्हॅनमध्ये फक्त सात विद्यार्थी बसविण्याची परवानगी आहे. असे असताना व्हॅनमधून १५ ते २० विद्यार्थी बसवून चालक विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. सकाळ, दुपारी कोंबलेल्या विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसत असते. एमआयडीसीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेसमोरून गेल्या दोन महिन्यांपासून सात ते आठ व्हॅन विद्यार्थ्यांची बेकायदेशीरपणे वाहतूक करीत आहेत. एका व्हॅनमध्ये सुमारे १५ ते २० विद्यार्थी कोंबलेले असतात. या व्हॅनला काही अपघात झाला आणि मुलांचे काही कमी-जास्त झाले तर शाळेचे व्यवस्थापन अडचणीत येईल, अशी भीती शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. अनेक रिक्षाचालक फळ्या टाकून नऊ ते दहा मुलांची वाहतूक करीत आहेत. व्हॅनमधून विद्यार्थ्यांची बेकायदेशीरपणे वाहतूक सुरू असताना काही पालकांचा त्यास पाठिंबा असल्याच्या तक्रारी शाळांच्या व्यवस्थापनाने सुरू केल्या आहेत. व्हॅन, रिक्षांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू असल्याने काही शाळांच्या बस रिकाम्या असतात. एका बसमध्ये ५० ते ५५ विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याची क्षमता असते. बसमध्ये एक चालक व एक सेवक कार्यरत असतो. त्यांचा पगार नियमित द्यावा लागतो. बसमध्ये फक्त जर १५ ते २० मुलेच प्रवास करीत असतील तर त्या शाळेचे आर्थिक नुकसान असते. डिझेल, टायर, सुटे भागाच्या वाढत्या किमती त्यामुळे शालेय बसचा खर्च वाढला आहे. त्यामुळे बसमधून विद्यार्थी वाहतूक होण्यासाठी वाहतूक व आरटीओ विभागाने शाळांना सहकार्य करावे, अशी काही शाळाचालकांची मागणी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा