*  देऊळगावराजा परिसरात अवैध वृक्षतोड
*  पर्यावरण व जैवसाखळी विस्कळीत
*  पर्जन्यमानात घट व दुष्काळ
बुलढाणा प्रादेशिक वनविभागाअंतर्गत येणाऱ्या देऊळगावराजा वनपरिक्षेत्रात जंगलातील व खाजगी वृक्षतोड प्रचंड प्रमाणावर होत असून मौल्यवान लाकडांची नियमबाह्य़रित्या परप्रांतात तस्करी होत आहे. यामुळे या परिसरातील जैवविविधता, पर्यावरण, प्राणी जीवन साखळी व पर्जन्यमान धोक्यात आले आहे. वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा याला आशीर्वाद असून वनतस्करांशी त्यांनी हातमिळवणी केल्याचा आरोप होत आहे.
देऊळगावराजा व सिंदखेडराजा तालुक्यात राखीव वनातील व खाजगी मालमत्तेच्या वृक्षांची प्रचंड प्रमाणावर अवैध कटाई व तस्करी होत आहे. या दोन्ही तालुक्यात वनक्षेत्रे विरळ व ओसाड होऊ लागली आहेत. आतापर्यंत कोटय़वधी रुपयांच्या सागवान, चंदन, निंब, बाभूळ, बेहडा व अन्य वृक्षांची प्रचंड प्रमाणावर तोड करण्यात आली. एकीकडे या परिसरात वनांचे रक्षण, संवर्धन, पर्यायी वनांची निर्मिती, वृक्ष लागवड, शासकीय वनीकरण यावर कोटय़वधी रुपयांचा खर्च केला जात आहे. या खर्चाचा केवळ कागदोपत्री हिशेब लावला जात असून प्रत्यक्षात हा पैसा व्यर्थ गेला आहे. यापैकी कुठलेही काम समाधानकारक होऊ शकलेले नाही.
नवे वनीकरण व वृक्षसंवर्धन होत नसतांना निसर्गदत्त जंगलातील शासकीय व खाजगी जमिनीवरील सागासारख्या मौल्यवान वृक्षांची मोठय़ा प्रमाणावर अवैध कटाई करून या वृक्षांची मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व कर्नाटकात तस्करी केली जात आहे. खाजगी वृक्षतोड अधिनियमांचा सर्रास गैरवापर करून खाजगी शेतावरील ६० से.मी.पेक्षा कमी व्यासाच्या वृक्षांची खुलेआम तोड केली जात आहे. या वृक्षतोडीतून वनखात्याच्या परिक्षेत्रीय ते विभागीय कार्यालयापर्यंत लाखोंचा भ्रष्टाचार केला जात आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे देऊळगावराजा व सिंदखेडराजा तालुक्यातील जैवविविधता, पर्यावरण  व पर्जन्यमान धोक्यात आले आहे. वृक्ष नामशेष झाल्याने व जंगलाच्या विरळतेमुळे हिंस्त्र व तृणभक्षी प्राण्यांची जैव साखळी विस्कळीत झाली आहे. या दोन्ही तालुक्यात ठिकठिकाणी हरीण व काळविटांचे कळप हिवाळी, उन्हाळी शेतमालांची नासधूस करतांना दिसतात. या दोन्ही तालुक्यातील पर्जन्यमान कमालीचे घटले आहे. या दोन्ही तालुक्याचे पर्जन्यमान हे सरासरी आठशे आहे, मात्र येथे गेल्या दोन वर्षांंपासून केवळ तीनशे मि.मी. पाऊस पडतो. अवर्षणामुळे दुष्काळ, पाणीटंचाई व चाराटंचाई असे प्रश्न निर्माण झाले असून या प्रश्नांमुळे नागरी जीवन अस्वस्थ झाले आहे.
या सर्व नैसर्गिक संकटांना अवैध व खाजगी वृक्षतोड मोठय़ा प्रमाणावर जबाबदार असून याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रशासकीय जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे. पर्यायी वनीकरणांसाठी असलेल्या कॅम्पा, एफडीए, नियोजन, पर्यायी वृक्षलागवड व संवर्धन, अशा प्लॅनमधील वृक्षसंवर्धनावर कागदोपत्री कोटय़वधी खर्च होत असून प्रत्यक्षात पन्नास टक्केही कामे केली जात नाहीत. जंगलाचे संरक्षण करावयाचे नाही, पर्यायी वनीकरण व वृक्षसंवर्धनात, तसेच वनजलसंधारणात क ोटय़वधी रूपयांची  खाबुगिरी करावयाची, असा अफलातून कार्यक्रम वनखात्याचा सुरू आहे.
या संदर्भात बुलढाण्याचे उपवनसंरक्षक दिलीप गुजेला यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. वनखात्याच्या जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्क्रीय व भ्रष्ट कारभारामुळे जिल्ह्य़ातील वनांची अक्षरश: वाट लागत आहे. त्यास हे अधिकारी संपूर्णत: जबाबदार असल्याचा आरोप वनपाल व वनरक्षक संघटनेच्या जिल्हास्तरीय माजी पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ते म्हणाले की, या अधिकाऱ्यांना वनसंरक्षणापेक्षा स्वत:च्या तुंबटय़ा भरण्यातच विशेष रस आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोटय़वधीचा खर्च होऊन वने नामशेष होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader