डोंबिवली येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीतील अनेक लहानमोठय़ा कंपन्या बंद पडल्या आहेत. या बंद कंपन्यांशेजारी असलेले मोकळे भूखंड हडप करून तेथे बेकायदा हॉटेल, ढाबे उभारण्याचे प्रकार वाढीस लागले असून एमआयडीसी भागात रस्त्याच्या कडेला बिनधोकपणे उभी राहणारी ही हॉटेलनगरी अनेकांना अचंबित करू लागली आहे. विशेष म्हणजे, भूखंड माफियांच्या दहशतीमुळे या भागातील काही बडे उद्योजकही धास्तावले असून स्थानिक पोलीस हे सगळे उघडय़ा डोळ्याने पाहत असल्याने भूखंड बळकावून उभे राहत असलेल्या ढाब्यांचे प्रमाण दररोज वाढत असल्याचे चित्र आहे.
डोंबिवली एमआयडीसी भागात बंद पडलेल्या कंपन्यांची संख्या मोठी आहे. कंपन्यांच्या मोकळ्या जागा, रस्त्यांच्या कडेला असलेले मोकळे कोपरे बळकावण्याची जणू या भागात स्पर्धाच लागली आहे. एमआयडीसीतील टाटा लाइन, विको नाका परिसर, खंबाळपाडा परिसर, मानपाडा, शिळफाटा रस्ता परिसरात बेकायदा पद्धतीने उभारण्यात आलेल्या हॉटेल, ढाब्यांची अक्षरश: रांग लागली आहे. एमआयडीसीतून गेलेल्या जलवाहिन्यांमधून या हॉटेलांना चोरून पाण्याच्या जोडण्या घेण्यात आल्या आहेत. या चोरटय़ा जलवाहिन्या अनेक ठिकाणी फुटल्याने पाणी वाया जाण्याचे प्रमाणही मोठे आहे. या बेकायदा हॉटेलांना महावितरण कंपनीमार्फत वीजजोडण्या दिल्या जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सावित्रीबाई फुले रंगमंदिर परिसरात बेकायदा पद्धतीने अशी हॉटेल्स उभारण्यात आली आहेत. एमआयडीसी तसेच स्थानिक पोलिसांचे या अनधिकृत हॉटेलनगरीकडे दुर्लक्ष होत असून दिवसेंदिवस बेकायदा धंद्याचे जाळे फोफावत चालल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मंदिरांची दुकानेही जोरात
एमआयडीसीमधील काही कंपन्यांच्या समोर, मोकळ्या कोपऱ्यावर प्रशस्त, देखणी मंदिरे उभारण्यात आली आहेत. अशा प्रकारे छोटी मंदिरे काही अज्ञात व्यक्ती बांधतात. तेथे त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करतात. मंदिराचा ट्रस्ट स्थापन झाला की मग तेथील जागा बळकावण्याचे प्रकार काही मंडळी करीत असल्याचे येथील उद्योजकांनी सांगितले. मंदिराला लागून मग अनधिकृत टोलेजंग बांधकाम उभारले जाते. असे अनुभव काही उद्योजकांनी सांगितले. एमआयडीसीने या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे आवश्यक आहे. पण एमआयडीसीची अंमलबजावणी यंत्रणा ठाणे येथे असल्याने अनधिकृत बांधकामे उभी राहिल्यानंतर ही यंत्रणा जागी होते.
एमआयडीसीकडून तपासणी
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता नितीन वानखडे यांनी सांगितले, एमआयडीसीसाठी जागा देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना १०० चौरस मीटरचे भूखंड देण्यात आले आहेत. त्या जागेचा वापर काही प्रकल्पग्रस्त व्यापारी जागा म्हणून करू शकतात. अशा जागा मिळालेल्या प्रकल्पग्रस्तांनी त्या जागेचा वापर व्यापारीकरणासाठी केला असावा. तरीही अशा व्यापारी वापराच्या जागांचा वापर अधिकृतपणे सुरू आहे का, याची तपासणी केली जाईल.
पोलिसांच्या छाप्यानंतरही बेकायदा उद्योग सुरूच
गेल्या आठवडय़ात स्थानिक पोलिसांनी पिसवली भागातील अप्सरा व इगो बारवर छापे टाकले आहेत. या ठिकाणाहून १७ बारबालांना अटक करण्यात आली. मानपाडा पोलीस व ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने या कारवाया केल्या आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. असे असले तरी पोलिसांची पाठ वळताच बेकायदे धंदे पुन्हा सुरू होतात, असा आजवरचा अनुभव आहे.
एमआयडीसीला बेकायदा हॉटेलचा विळखा
डोंबिवली येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीतील अनेक लहानमोठय़ा कंपन्या बंद पडल्या आहेत. या बंद कंपन्यांशेजारी असलेले मोकळे भूखंड हडप करून तेथे बेकायदा हॉटेल, ढाबे उभारण्याचे प्रकार वाढीस लागले असून एमआयडीसी भागात रस्त्याच्या कडेला बिनधोकपणे उभी राहणारी ही हॉटेलनगरी अनेकांना अचंबित करू लागली आहे.
First published on: 28-05-2013 at 01:48 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegitimate hotels grips midc