कल्याण-डोंबिवली शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाटय़ाने वाढत असून दर महिन्याला या वाहनसंख्येमध्ये सुमारे साडेतीन हजार दुचाकी वाहनांची भर पडत आहे. वाढत्या शहरीकरणात एकीकडे नागरिकांना राहण्यासाठी घराच्या जागेची समस्या भेडसावत असतानाच दुसरीकडे नव्याने खरेदी होत असलेल्या या वाहनांची पार्किंग करायची कुठे हा प्रश्नही सतावू लागला आहे. कल्याण शहरामध्ये रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळ फुल्ल झाल्यानंतर हजारो वाहने रस्त्यावरच पार्किंग केली जात असून स्टेशन परिसरातील मुरबाड रोड, शिवाजी चौक, बैलबाजाराकडे जाणारे रस्ते दुतर्फा बेकायदेशीर पार्किंगमुळे भरलेले असतात. याचा मोठा फटका स्थानक परिसरातील पादचाऱ्यांना होत असून फेरीवाल्यांनी अडवलेले पदपथ आणि रस्त्याच्या कडेवरील पार्किंग यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाले आहे.
मुजोर रिक्षाचालक, फेरीवाल्यांचा कोंडाळा यामुळे कल्याण स्थानक परिसराची अवस्था गचाळ बनली असून यावर वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाचे कोणतेच नियंत्रण नसल्यामुळे हा प्रश्न अधिकच जटिल बनला आहे. स्कायवॉकच्या आडोशाने फेरीवाल्यांनी आपल्या टपऱ्या उभारण्यास सुरुवात केली असून पालिका प्रशासनाची याकडे होणारी डोळेझाक कल्याणकरांच्या चिंतेचा विषय बनली आहे. पोलीस प्रशासनसुद्धा पालिकेच्या पावलावर पाऊल टाकत निष्क्रिय बनत चालले असून त्याचा फटका येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. रेल्वे स्थानक परिसरात गोंधळ निर्माण करण्यामध्ये फेरीवाले, रिक्षावाले यांच्याबरोबरीने अनधिकृत आणि बेशिस्तपणे होत असलेल्या पार्किंगचा सहभाग मोठा आहे. विशेष म्हणजे कल्याण शहराला पुरेसे ठरेल असे वाहनतळ नसल्याने हा गोंधळ अधिकच वाढत आहे.वाढत्या नागरिकरणामुळे आता कल्याणचा विस्तार भिवंडी पडघ्यापासून खडकपाडय़ापलकडच्या ग्रामीण भागातही झाला आहे. या भागात स्थानकापासून दूर राहणारे प्रवासी मोठय़ा संख्येने दुचाकी वाहनावरून कल्याण स्थानकात पोहोचतात. स्थानक परिसरात रेल्वेचे वाहनतळ आणि महापालिकेचे कपोते वाहनतळ असून त्याची पार्किंग व्यवस्था अत्यंत मर्यादित आहे. या वाहनतळाच्या क्षमतेपेक्षा कैकपट अधिक वाहने स्टेशन परिसरात आल्याने ही वाहने बेकायदेशीर पद्धतीने पार्किंग केल्याशिवाय नागरिकांसमोर पर्याय उरत नाही. त्यामुळे ही सगळी वाहने मुरबाड रोड, शिवाजी चौक आणि बैलबाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पार्क केली जातात. कल्याण शहरातील पदपथांचा ताबा फेरीवाल्यांनी घेतला असून रस्त्यांवर पार्किंग होऊ लागल्याने रस्त्यावरून चालणे अशक्य होऊन बसले आहे.
वाहनतळाची गरज..
कल्याण स्थानक परिसरातील बेकायदेशीर आणि अनधिकृत पार्किंग रोखण्यासाठी वाहनतळाची गरज असून नागरिकांकडून ही मागणी होत आहे. पार्किंगसाठी मोठी जागा महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून देण्याची गरज असून अत्यंत सुसज्ज पार्किंग व्यवस्था असणारे वाहनतळ कल्याणमध्ये उपलब्ध व्हावे अशी मागणी कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम यांनी व्यक्त केली आहे.