शहरात उभारण्यात आलेले सर्व अवैध फलक काढून टाकण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूप महापालिकेला दिले. यासंदर्भात न्यायालयाने नोटीस जारी करून राज्य सरकारला स्पष्टीकरण मागितले आहे. नागरिकांचा छळ थांबविण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या याबाबतही विचारणा केली आहे.
सर गंगाधरराव चिटणवीस ट्रस्टने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. भूषण गवई आणि न्या. अशोक भंगाळे यांच्या खंडपीठाने शहरभर उभारण्यात आलेल्या फलकांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांचे येणे-जाणे सुरू असल्याने वाहतूक खोळंबत असून लोकांची गैरसोय होत आहे. लोकांचा होत असलेला छळ थांबवा, अशी विचारणा न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.
विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने लोक सिव्हील लाईन्स भागात हिस्लॉप कॉलेजजवळ रस्त्याच्या बाजूला मंडप उभारणी करीत असल्यामुळे आपल्या रुग्णालय इमारतीजवळ अपायकारक स्थिती निर्माण होत आहे, असा आरोप करीत या याचिकेत करण्यात आला आहे.
अतिरिक्त सरकारी वकील भारती डांगरे यांनी राज्य सरकारच्या वतीने नोटीस स्वीकारली. न्यायालयात महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. सुधीर पुराणिक आणि याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. अक्षय नाईक यांनी बाजू मांडली.