जिल्हय़ातील सुमारे ५२ हजारांच्या कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे सुमारे २ अब्ज ३८ कोटी रुपयांची वीजबिलाची बाकी थकली आहे. थकीत देयकापोटी १३ हजार कृषिपंपाची वीज खंडित करण्यात आली. दुसरीकडे वीज चोरून वापरणाऱ्यांना मात्र महावितरणचे अभय मिळत असल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेले खरिपाचे पीक परतीच्या पावसामुळे हिरावून नेले. जिल्हा प्रशासनावर पीकनुकसानीचे सर्वेक्षण करण्याची तिसऱ्यांदा वेळ आली. गेल्या वर्षी कमी पावसाने जिल्हय़ात दुष्काळ पडला. अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. पाण्याअभावी ऊस, केळी, संत्र्याच्या बागा जळून गेल्या. रब्बीचे पीक घेताच आले नाही.
जिल्हय़ातील शेतकरी अशाप्रकारे अस्मानी व सुलतानी संकटात असताना महावितरणने मात्र कृषिपंपाच्या थकीत देयकापोटी वीज खंडित करण्याचा सपाटा लावल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. वसमत तालुक्यात ७० कोटी ४२ लाख, कळमनुरी ४१ कोटी ८८ लाख ४७ हजार, हिंगोलीत ३४ कोटी ८७ लाख ३७ हजार, तर औंढा नागनाथ तालुक्यात ४७ कोटी ८८ लाखांची थकबाकी आहे. एकूण २ अब्ज ३८ कोटींची थकबाकी होईपर्यंत महावितरण कंपनी गप्प का बसली, असा मुद्दा उपस्थित होत आहे.
गेल्या वर्षभरापासून शेतकरी कोणत्या ना कोणत्या अडचणीत सापडत आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्याला रब्बी पीक घेता आले नाही. फळबागा वाळून गेल्या. या वर्षी अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला असताना महावितरणची वसुली हे शेतकऱ्यांवर मोठेच संकट मानले जात आहे. शहरात आकडे टाकून भरदिवसा होणारी वीजचोरी, धनदांडग्यांकडे थकबाकी असताना शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची वीज मात्र खंडित केली जात असल्याने शेतकरीवर्ग नाराज आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा