भारनियमन मुक्तीचा दावा महावितरणकडून करण्यात येत असला तरी शहरातील काही भागांमध्ये आठवडय़ातील ठराविक दिवशी नियमितपणे अचानक कधीही वीज गायब होण्याचे प्रकार सुरूच असून हे कमी म्हणून की काय पंचवटीतील अमृतधाम परिसरात सध्या कमी-अधिक दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तु जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. अमृतधाम परिसरातील लक्ष्मीनगर, शारदा हौसिंग सोसायटी, औदुंबरनगर या भागात अपवाद वगळता दर शनिवारी तीन ते चार तास वीज गायब होते. वीज गायब होण्याचे हे प्रमाण इतके नियमित आहे की जणू अप्रत्यक्षरित्या महावितरणने भारनियमन सुरू केले आहे की काय असे वाटावे. या अप्रत्यक्षरित्या होणाऱ्या भारनियमनाची परिसरातील नागरिकांनीही सवय करून घेतली. त्यामुळे महावितरणने आता नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहात दोन दिवसांपासून कमी-अधिक दाबाने वीज पुरवठा सुरू केला आहे. शनिवारी रात्रभर कमी-अधिक दाबाने होणाऱ्या वीज पुरवठय़ाचा खेळ सुरू होता. शहरात याआधीही काही ठिकाणी कमी-अधिक दाबाने होणाऱ्या विद्युत पुरवठय़ाने घरांमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून हजारो रूपयांचे नुकसान झाले होते. तशाच प्रकारचा धोका उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन या भागातील नागरिक भयभीत आहेत. त्यामुळे महावितरणने त्वरीत हा खेळ थांबविण्याची आणि नियमितपणे वीज पुरवठा करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा