सोलापूर महानगरपालिकेने नोकरीत अंध, कर्णबधिर अपंगांचा अनुशेष भरून काढण्यासाठी केलेल्या भरती प्रक्रियेंतर्गत परीक्षांचा निकाल लगेच जाहीर करण्यात आला. परीक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणांसह संपूर्ण गुणवत्तायादी महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली. पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पालिकेत रुजू झाल्यानंतर आपल्या कार्यशैलीचा प्रभाव दाखविण्यास सुरुवात केली असून याच पारदर्शक कार्यशैलीचा भाग म्हणून अंध उमेदवारांच्या परीक्षा निकालाकडे पाहिले जात आहे.
महापालिकेने अंध, अपंग कर्णबधिरांच्या विविध रिक्त जागांचा अनुशेष भरून काढण्यासाठी नोकर भरतीची प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यासाठी दोन दिवस सुमारे नऊशे अपंग उमेदवारांच्या परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षेनंतर लगेचच त्यांचा निकालही जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे या परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी परीक्षांचे पेपर तपासताना त्यात कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून पेपर तपासणीच्या ठिकाणी महापालिकेत व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. पेपर ज्या उमेदवारांना पाहिजे असल्यास त्यांना सदर पेपरची सत्यप्रत उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही प्रथमच पाहावयास मिळाली. आयुक्त  गुडेवार यांच्या या पारदर्शक कार्यपद्धतीचे नागरिकांनी कौतुक केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Immediately result in handicapped recruitment in solapur mnc