वैद्यकीय शिक्षणासाठी एकेकाळी लौकिकप्राप्त संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अवस्था गेल्या काही वर्षांपासून केविलवाण्या रुग्णासारखी झाली असून, त्याकडे दुर्लक्ष झाल्यास येत्या काही काळात या वैद्यकीय महाविद्यालयाचा लौकिक राज्यात सर्वात ‘शेवटून पहिला’ म्हणून ओळखले जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
शासनाचे धोरण व नोकरशाही यामुळे डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षकांची पदे सद्य:स्थितीत १५५ पैकी ११२ कार्यरत असून उर्वरित ४३ पदे रिक्त आहेत. ती भरली जाण्यात विलंब होत असल्यामुळे त्याचा फटका वैद्यकीय शिक्षणावर होत आहे. या महाविद्यालयात वर्ग एक संवर्गातील प्राध्यापकांची मंजूर पदे २१ असताना त्यापैकी ६ पदे रिक्त आहेत. तर वर्ग दोनच्या संवर्गातील सहयोगी प्राध्यापकांची ५७ पदे मंजूर असताना त्यापैकी तब्बल ३५ पदे रिक्तच आहेत. सहायक प्राध्यापकांची पदे हीच तेवढी एक समाधानकारक बाब आहे. या सहायक प्राध्यापकांची दोन पदे रिक्त आहेत. विशेषत: शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, मानसोपचारशास्त्र, क्षयरोग आदी विभागांमध्ये प्राध्यापकाची कमतरता दिसून येते.
प्राध्यापकांची पदे वर्ग एकची असल्यामुळे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जातात. रिक्त पदे भरण्यासाठी वारंवार पाठपुरावा होणे आवश्यक असताना महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून त्याबाबत केवळ पाटय़ा टाकण्याचे काम केले जात असल्याची प्रतिक्रिया येथील वैद्यकीय विद्यार्थी व्यक्त करतात. तर सहयोगी प्राध्यापकांची रिक्त पदांची संख्या जास्त म्हणजे ५७ पैकी ३५ एवढी असताना ही पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचे अधिकार वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना आहेत. परंतु त्यातसुद्धा योग्य कार्यवाही होताना दिसून येत नाही. अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे हे डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इतिहासात सर्वाधिक काळ म्हणजे सुमारे आठ वर्षांपासून ठाण मांडून बसले आहेत.
दोन वर्षांपूर्वी शासकीय महाविद्यालय व त्यास संलग्न असलेल्या जिल्हा सवरेपचार रुग्णालयाचे व्यवस्थापन पूर्णत: वैद्यकीय शिक्षण विभागाकडे गेले असून, आरोग्य विभागाचा त्याच्याशी असलेली संबंध तोडला गेला आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाकडून व्यवस्थापन चालविताना त्यात एकसूत्रीपणा येऊन पर्यायाने वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजात भरीव सुधारणा होणे अपेक्षित होते. परंतु सोलापुरात त्याची प्रचिती दिसून येत नाही. येथील वैद्यकीय महाविद्यालयात एबीबीएसच्या १५० तर पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या सुमारे ६० जागा आहेत. या महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयातील खाटांची एकूण संख्या ७३३ एवढी आहे. या रुग्णालयात दररोज सरासरी १५०० रुग्ण बाहय़रुग्ण विभागात तर १५० पेक्षा अधिक रुग्ण प्रत्यक्ष उपचारासाठी आंतररुग्ण विभागात दाखल होतात. या रुग्णालयात सोलापूरसह आसपासच्या उस्मानाबाद, विजापूर, गुलबर्गा, बिदर आदी भागांतील रुग्ण येतात. परंतु अलीकडे रुग्णसेवेचे दर्जा पार घसरल्यामुळे या रुग्णालयाची तथा वैद्यकीय महाविद्यालयाची गुणात्मक घसरण होत असल्याचे तेथील डॉक्टर मंडळीच खासगीत बोलतात.
सुशीलकुमार शिंदे व विजयसिंह मोहिते-पाटील हे दोघे २००३-०४ साली अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या पुढाकाराने या रुग्णालयात सुमारे १९ कोटी खर्च करून नवीन विस्तारित इमारत बांधण्यात आली. परंतु या नव्या इमारतीत नवीन अद्ययावत यंत्रसामग्रींचा अभाव आहे. या नव्या इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामाचाही बोजवारा उडाल्याचे दिसून येते. स्वच्छतेच्या कामांसाठी खासगी तत्त्वावर पदे भरण्यात आली तरी सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव पाहावयास मिळतो. संपूर्ण रुग्णालयात पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्थाच नसल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना रुग्णालयाच्या आवारातील एका सेवाभावी संस्थेच्या पाणपोईचा आधार घ्यावा लागतो. रुग्णालयातील पाणी पिण्यासाठी वापरल्यास नव्या आजारांना निमंत्रण मिळण्याची भीती केवळ रुग्णच नव्हेतर तेथील कर्मचारी व्यक्त करतात. दररोजच्या वापरण्यासाठी असलेल्या पाण्याची व्यवस्थाही अधूनमधून खोळंबते. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दैनंदिन नैसर्गिक विधीही उरकता येत नाही. तर काही वेळा पाण्याअभावी शस्त्रक्रियाही पुढे ढकलाव्या लागतात, अशी शोचनीय परिस्थिती दिसून येते.
अलीकडे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासासाठी शासनाकडून दहा कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. हा निधी तातडीने उपलब्ध झाल्यास महाविद्यालयाचा घसरलेला दर्जा काही प्रमाणात का होईना सुधारण्यास मदत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  

Story img Loader