आगरी समाजात लग्नापासून ते अंत्येष्टीच्या कार्यक्रमात होणारी बेसुमार उधळपट्टी थांबावी म्हणून वारकरी सांप्रदायिक महासंघातर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. कार्यक्रमातील उधळपट्टीवर बंधने आणणाऱ्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. काटई गावातील आगरी समाजाच्या घरी एका वृद्ध महिलेचे निधन झाल्यानंतर या घरातील कुटुंबीयांनी अंत्येष्टीचा कार्यक्रम आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी अतिशय साधेपणाने केला. यापूर्वीच्या प्रथेप्रमाणे कोणीही अहेरसदृश भेट वस्तू आणू नयेत, असे जाहीर करण्यात आले.
काटई गावात फसूबाई काथोड चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा वकील मुलगा सुनील चौधरी यांनी उपस्थित ज्ञाती बांधवांसमोर आमच्या दु:खाचे सांत्वन करण्यासाठी कोणीही दररोज येऊ नये. फक्त दोन दिवसांत हा सांत्वन बैठकीचा कार्यक्रम होईल. अंत्येष्टी विधीतील दहावे व तेरावे कार्यक्रम एकाच दिवशी करण्यात येईल. अंत्येष्टीच्या कोणत्याही कार्यक्रमात कपडे, भांडी व अन्य भेटवस्तू आणू नयेत, असे जाहीर आवाहन करण्यात केले. उपस्थित नागरिकांनी त्यांच्या सूचनेचे स्वागत केले. या वेळी अभियानातील कार्यकर्ते वसंत पाटील, शरद पाटील, भगवान पाटील, राजाराम बुवा पाटील उपस्थित होते. अन्य ज्ञाती बांधवांनी हीच प्रथा यापुढे रूढ करावी, अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती.