ग्रामीण भागातील तरुणांना कुस्तीची ऊर्जा देण्याचा मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचा प्रयत्न मोलाचा असून, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही डबल महाराष्ट्र केसरी, ख्यातनाम मल्ल चंद्रहार पाटील यांनी दिली.
मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानच्या दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय व मोकाशी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयातर्फे मॅटवरील कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात आले होते. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत या राज्यस्तरीय कुस्त्यांचे उदघाटन ऑलिम्पिक कुस्ती प्रशिक्षक गुरुवर्य उत्तमराव पाटील यांच्या हस्ते दिमाखात पार पडले. कुस्त्यांच्या मैदानाबरोबरच शरीरसौष्ठव व वजन उचलणे या स्पर्धाचे उदघाटनही झाले. याप्रसंगी चंद्रहार पाटील बोलत होते. मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे जनरल सेक्रेटरी अभिजित मोकाशी, उपाध्यक्ष विश्वजित मोकाशी, प्राचार्य बी. आर. पाटील आदी मान्यवरांसह राज्यभरातून आलेल्या मल्लांची उपस्थिती होती. या कुस्त्या दोन दिवस चालणार आहेत.
अभिजित मोकाशी म्हणाले, की स्वर्गीय दादासाहेब मोकाशी यांनी ग्रामीण भागाला विकासाचा चेहरा देण्यासाठी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या अनुषंगाने महाविद्यालय स्थापन केली. हे प्रतिष्ठान आता वटवृक्ष होऊ पाहात असून, ग्रामीण विद्यार्थ्यांना आधारवड ठरत आहे.
प्रास्ताविकात विश्वजित मोकाशी यांनी प्रतिष्ठानतर्फे समाजहिताच्या सर्वच उपक्रमांना सहकार्य देण्याचे व असे उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.