दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना खऱ्या अर्थाने मानसिक आधाराची आवश्यकता असते. डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे रुग्ण बरा होतो हे खरे असले तरी त्याला रुग्णांनी दिलेला प्रतिसाददेखील महत्त्वाचा असतो, असे मत अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विनोद इंगळहळीकर यांनी व्यक्त केले.
भिवंडी वाचन मंदिर संस्थेच्या सेविका आणि लेखिका नीला मराठे लिखित, अरविंद प्रकाशन प्रकाशित ‘नवी पहाट आयुष्या’ची या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच भिवंडी येथील गणपती मंदिर सभागृहात झाले. यावेळी लेखक अरुण मैड, वाचन मंदिर संस्था भिवंडीचे अध्यक्ष सुधीर सिंगासणे, आशा भिडे, नीला मराठे, शरद मराठे आणि अरविंद डिगवेकर उपस्थित होते. यावेळी डॉ. इंगळहळीकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
 नीला मराठे यांना जडलेल्या पाठीच्या दुखण्यावर त्यांनी मोठय़ा हिमतीने मात केली. आपले हे दुखणे बरे होणार हा त्यांचा आत्मविश्वास अधिक मोठा होता. त्यामुळेच त्या बऱ्या झाल्या आणि त्यांचे आजारपणातील अनुभव पुस्तक रूपाने आपल्यासमोर ठेवत आहेत. नीला मराठे यांचे ‘नवी पहाट आयुष्याची’ हे पुस्तक दुर्धर आजारातील रुग्णांना प्रेरणादायी ठरणारे पुस्तक असेल, असे  डॉ. विनोद इंगळहळीकर यांनी सांगितले.  
‘नवी पहाट आयुष्या’ची हे पुस्तक डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे आहे. जसे आदर्श डॉक्टर असतात त्या प्रमाणे आदर्श रुग्णदेखील असतात. नीला मराठे या आदर्श रुग्णांचे एक उदाहरण आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाने वागणे गरजेचे आहे. रुग्णांना आजारपणात मानसिक आधाराची गरज असते आणि चांगल्या पुस्तकातून ती मिळू शकते.
मीना मराठे यांचे पुस्तक हे त्या प्रकारचेच आहे, असे इंगळहळीकर यांनी सांगितले. आशा भिडे यांनी नीला मराठे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. दुर्धर आजारात माणसाची खरी कसोटी लागते, मात्र त्यावर मात करून आलेल्या अनुभवांना लोकांसमोर मांडण्यासाठीदेखील मोठे धैर्य लागत असते, असे भिडे म्हणाल्या.

Story img Loader