विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यास सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावणारा निकाल येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. देशमुख यांनी नुकताच दिला आहे.
घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली गावातील वैजनाथ घोगरे आणि बदनापूर तालुक्यातील अर्चना चव्हाण यांचा विवाह २००९च्या मार्चमध्ये झाला होता. मोटारसायकलसाठी माहेराहून दहा हजार रुपये आणण्यासाठी अर्चनाचा सासरी छळ सुरू झाल्याने १३ जानेवारी २०१० रोजी विषारी औषध प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप होता. यासंदर्भात या विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या प्रकरणात न्यायालयाने मृत विवाहितेचा पती वैजनाथ घोगरे यास सात वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सासू रुक्मिणी घोगरे हीस चार वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड, तसेच सासरा गीताराम यास पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ४९८ (अ) कलमान्वयेही तिन्ही आरोपींना प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात शासनाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील वर्षां मुकीम यांनी काम पाहिले.

Story img Loader