श्रेय घेण्यावरून सेना-लोकशाही आघाडीत चढाओढ
अंबरनाथ शहरातील भविष्यकालीन लोकसंख्या विचारात घेऊन वाढीव पाणीपुरवठा योजना राबविली जात असून त्यासाठी तब्बल ७७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी ५० टक्के अर्थसाहाय्य शासन करणार असून उर्वरित ५० टक्के रक्कम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्जाद्वारे उभी करणार आहे. सध्या असमान वितरण तसेच गळतीमुळे अंबरनाथ शहरास पुरेसा पाणीपुरवठा होऊनही अनेक भागातील नागरिकांना पाणी टंचाई भेडसावते. या योजनेनंतर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
२०११च्या जनगणनेनुसार अंबरनाथ शहराची लोकसंख्या २ लाख ७४ हजार इतकी असून सध्या ती तीन लाखांच्या घरात आहे. आता २०४१मध्ये शहराची लोकसंख्या ६ लाख ३२ हजार ८४८ इतकी होईल, हे गृहीत धरून नवी विस्तारित पाणी योजना राबविण्यात येत आहे. अंबरनाथ शहरास सध्या एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच पालिकेच्या चिखलोली धरणातील योजनेतून ५७ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. मात्र जुन्या जलवाहिन्यांमुळे त्यातील ४० टक्के पाणी गळतीमुळे वाया जाते. वाढीव पाणी पुरवठा योजनेत नव्या वाहिन्या टाकण्यात येणार असून चिखलोली धरणाची उंची अडीच मीटरने वाढवली जाणार आहे. त्याचप्रमाणे चिखलोली येथे ७.२० दशलक्ष लिटर्स क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, शहरात विविध ठिकाणी आठ जलकुंभ बांधणे, जल शुद्धीकरण केंद्रात पंपिंग यंत्रणा बसविणे आदी कामांचा यात समावेश आहे. स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी या योजनेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला.
‘झाली भूमिपूजने बहु’
कागदावर शासनाची ही योजना अतिशय आदर्श आणि महत्त्वाकांक्षी वाटत असली तरी ती प्रत्यक्षात कार्यान्वित होईल की नाही, याबाबतीत अंबरनाथकर साशंक आहेत. कारण गेल्या दोन-तीन वर्षांत शहरात भूमिपूजनाचे बरेच नारळ फुटले, पण त्यातील बरेचसे प्रकल्प कार्यान्वित झालेच नाहीत. शहराच्या पूर्व विभागातील शिवाजी चौक ते स्वामी समर्थ चौक या शिवमंदिर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत बंद पडले आहे. त्यासाठी भर बाजारपेठेतील अर्धा रस्ता खोदून ठेवल्याने नागरिकांना ये-जा करताना अतिशय त्रास होत आहे. पार्किंगसाठी शिवाजी चौकातील य. मा. चव्हाण खुल्या नाटय़गृहाचा बळी देऊन एक चांगले मैदान पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी गमावले आहे. नवे काही फारसे केले नाही, पण सोन्यासारखे जुने मैदान मात्र निर्दयपणे नष्ट करून सत्ताधारी शिवसेनेने मोगलाईचे दर्शन घडविले, अशी अंबरनाथकरांची या संदर्भात संतप्त भावना आहे. या प्रकल्पाचे कामही अतिशय कूर्मगतीने सुरू आहे. महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाची औद्योगिक वसाहत असणाऱ्या शहरातील आनंदनगर वसाहतीकडे जाणाऱ्या वडवली रस्त्याचे काम रेंगाळत ठेवून पालिका प्रशासनाने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला. नुकत्याच ओसरलेल्या अतिवृष्टीत नागरिकांचे अतोनात हाल झाल्यानंतर उपरती आलेल्या पालिका प्रशासनाने या रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेतले आहे. पालिकेत सध्या नगराध्यक्ष शिवसेनेचा पण इतर समित्या विरोधी पक्षांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सारेच सत्ताधारी आणि तेही एकमेकांच्या विरोधात अशी परिस्थिती आहे. जलकुंभ भूमिपूजन सोहळ्यातही त्याचे दर्शन घडले. श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि लोकशाही आघाडीत चढाओढ झाली. एकाच कामाचे दोन-दोन नारळ फोडण्यात आले. मात्र त्यातून लोकप्रतिनिधींचा उथळपणाच दिसून आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा