सालेकसा तालुक्यातील र्देकसाजवळील हाजराफॉलमध्ये दोन दिवसांपूर्वी नागपूर येथील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेसह गेल्या पाच वर्षांत ३० जणांचा या धबधब्यात बुडून मृत्यू झाल्याची बाब स्थानिक मच्छिमारांकडून समोर आली असून वनविभागाचे उदासीन धोरण व येथील असुरक्षिततेमुळे हे प्रकार सातत्याने घडत आहे.
हाजरा फॉल हा धबधबा शासनमान्य पर्यटनस्थळ नसले तरी पर्यटकांसाठी मात्र हे विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. विशेषत: तरुणांसाठी हे पर्वणीच ठरते. याशिवाय, विदेशी पर्यटकही येथे हजेरी लावत असतात. दरवर्षी हजारो लोक या ठिकाणी भेट देतात; दोन दिवसांपूर्वी नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या एम.बी.ए.च्या दोन विद्यार्थ्यांचा येथे बुडून मृत्यू झाला. शनिवारी ३६ तासानंतर त्यांचे मृतदेह शोधण्यात मच्छिमारांना यश आले; परंतु गेल्या पाच वर्षांत जवळपास ३० जणांचा येथे बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. दरवर्षी येथे असे दुर्दैवी प्रकार घडत असताना संबंधित प्रशासनाकडून या ठिकाणी कोणतेही सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. हाजराफॉल हा परिसर वनविभागाच्या ताब्यात येत असून, जाचक अटींमुळे पर्यटनाच्या दृष्टीने या क्षेत्राचा विकास होऊ शकलेला नाही. घनदाट जंगल व निसर्गरम्य वातावरणात पहाडातून कोसळणारा धबधबा पर्यटकांना नेहमीच खुणावतो. मात्र, पर्यटनाच्या दृष्टीने घातक असतानाही तरुण आव्हानात्मक पर्यटनासाठी येथे आकर्षिले जातात व याचेच दुष्परिणाम दरवर्षी अनेक जणांना मृत्यूच्या रूपात भोगावे लागतात. स्थानिक मच्छिमार बांधव हे तालुक्यातीलच कहाली या गावातील असून त्यांना हे मृतदेह काढण्यासाठी शासनाकडून कोणतेही मानधन दिले जात नाही. मृतांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या आर्थिक मदतीवर त्यांचे पालनपोषण होते. हे मच्छिमार बांधव मृतदेह काढण्यात तरबेज असून अनेकदा जीवाची पर्वा न करता बिकट परिस्थितीतही मृतदेहांना बाहेर काढतात.
मृत्यूचा धबधबा – शीतल यादव
सालेकसाचे तहसीलदार शीतलकुमार यादव यांना येथील घटनांबाबत प्रशासनाची भूमिका विचारली असता ते म्हणाले, हे स्थळ पर्यटनांच्या दृष्टीने विकसित होऊ शकत असले तरी अद्यापही पर्यटनस्थळ घोषित न झाल्याने येथील विकास रखडला आहे. त्यामुळे पर्यटनासाठी हे स्थळ सुरक्षित नसून पर्यटकांनी येथे येताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. येथे पर्यटकांसाठी लावण्यात आलेले धोक्याचे सूचना फलक चोरीला गेले आहेत.

Story img Loader