महाबळेश्वर येथे गेले दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आज तर येथे त्याची तीव्रता आणखीनच वाढली. शनिवारी सकाळी ८ ते रविवारी सकाळी ८ या काळात येथे २३०.६० मि.मी. म्हणजेच एका दिवसात १० इंच पावसाची नोंद झाली. रविवारी दिवसभर पाऊस कोसळत होता. यामुळे येथील प्रसिद्ध वेण्णा लेकची पातळी सुमारे १५ फुटांनी वाढली असून पाण्यात अडकलेल्या बोटी पाण्याबाहेर काढण्याचे काम पालिका कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर सुरू होते. वेण्णा लेक ते पाचगणी रस्ता जलमय झाला होता. सुमारे २ तास या मार्गाची वाहतूक ठप्प झाली होती. मुसळधार पावसामुळे येथील बाजारपेठ ते रांजणवाडी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या गंगा विहार – विष्णू विला या बंगल्यांची सुमारे ३० फूट उंचीची दगडी संरक्षक भिंत रस्त्यावर पडून फार मोठे नुकसान झाले व रस्ता बंद झाला. या वर्षी मान्सूनच्या पहिल्या आठवडय़ातील मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. हवामान खात्याच्या नोंदीनुसार १ जून ते आजपर्यंत येथे ८२६.६० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. शेवटच्या सुट्टीतील शनिवार-रविवारमुळे पर्यटकांची भरपूर गर्दी होती. संततधार पावसामुळे त्यांची कुचंबणा झाली. पाचगणी आणि वाई येथेही शनिवार सकाळपासून दमदार पाऊस आहे. हे चित्र सातारा, खंडाळा, फलटण, लोणंद या भागांतही दिसून आले.