शहर बस सेवेवरील (एएमटी) गंडातर तूर्त टळले आहे. ही सेवा देणा-या प्रसन्ना पर्पल कंपनीला येत असलेल्या तोटय़ापोटी महिन्याकाठी २ लाख ९६ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा ठराव मंगळवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. मात्र तोटय़ातून बाहेर पडण्यासाठी मनपाचे यंत्र अभियंता परिमल निकम यांच्यावर खास जबाबदारी सोपवण्यात आली असून तीन महिन्यानंतर त्याचा पुन्हा अहवाल सादर करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.
पंचवार्षिक निवडणुकीचे वेध लागलेल्या मनपाची सर्वसाधारण सभा आज महापौर शीला शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमहापौर गीतांजली काळे, उपायुक्त महेशकुमार डोईफोडे यावेळी उपस्थित होते. मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी रजेवर आहेत. त्यामुळे डोईफोडे यांच्यावरच प्रशासनाची जबाबदारी होती. अनेक प्रमुख नगरसेवकही या सभेला गैरहजर होते.
सभेच्या सुरूवातीलाच एएमटीच्या तोटय़ाबाबतच्या पडताळणी अहवालाचा होता. निकम व मनपाचे लेखापाल डी. डी. मेश्राम यांची समितीसाटी त्यासाठी नेमण्यात आली होती. या समितीच्या आज सादर झालेल्या अहवालानुसार शहर बस सेवेच्या कंत्राटदाराला कंपनीला तोटय़ापोटी महिन्याकाठी २ लाख ९६ हजार रूपये देण्याचा सूचना संभाजी कदम यांनी मांडली. मात्र काटकसर व अवांतर खर्च टाळण्याने या सेवेचा तोटा ५० टक्के कमी होऊ शकतो असे मत या समितीने दिले असून त्यादृष्टीने कार्यवाहीची जबाबदारी निकम यांच्यावर सोपवण्यात आली असून तीन महिन्यांनंतर त्याचा आढावा घेण्यात येणार आहे. या विषयाला सुरूवातीलाच बाळासाहेब बोराटे, निखील वारे, विनित पाऊलबुध्दे यांनी विविध आक्षेप नोंदवले. वारंवार तोटय़ाचे कारण पुढे करून कंत्राटदार कंपनी या सेवेसाठी मनपावर दादागिरी करीत असल्याचा आरोप बोराटे यांनी केला. अशा पध्दतीने वाईट प्रथा पडेल असे ते म्हणाले. वारे यांनी या कंपनीला तोटय़ाची भरपाई देण्याऐवजी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवून त्यावर काही मदत मिळवण्याची सूचना केली, त्यावर बरेच वादंग झाले. मनपाची आर्थिक स्थिती खराब असताना तोटय़ाची भरपाई देणे शक्य आहे काय, यावर लेखाधिकारी प्रदीप शेलार शेवटपर्यंत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यावरून वारे व पाऊलबुध्दे यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.
 शेलार यांच्यावर गंभीर आरोप
एएमटीची चर्चा मनपाच्या मोफत अंत्यसंस्कार योजनेवर घसरल्याने सभेला वेगळेच वळण लागले. सदस्यांनी शेलार यांच्यावर अत्यंत गंभीर आणि थेट आरोप केले. टक्केवारीच्या आरोपांसह शेलकी विशेषणे सदस्यांनी त्यांना दिली. आर्थिक धोरणाबाबत लेखाधिकारी शेलार कोणतेच ठोस मत व्यक्त करत नसल्याचा आक्षेप घेत पाऊलबुध्दे यांनी त्यांच्या प्रलंबीत कामांवरही आक्षेप घेतले. त्याअनुषंगाने मनपाच्या मोफत अंत्यसंस्काराचा मुद्दा उपस्थित झाला. अंत्यसंस्कार मंडळाला ठरल्यानुसार वेळच्या वेळी पैसे मिळत नसल्याने अमरधाम स्मशानभुमीत आता गौऱ्याही उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आणून देत संजय चोपडा यांनी शेलार यांना धारेवर धरले. बोराटे यांनीही शेलार यांच्यावर पैसे घेण्याचे जाहीर आरोप करत संताप व्यक्त करतानाच ते कार्यालयात संगणकावर पत्ते खेळत बसतात असाही आरोप केला. मनपाच्या चार्टर्ड अकौंटटलाही त्यांनी दहा टक्के मागितल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केल्याने सर्वच आवाक झाले, ही गोष्ट सिध्द करून दाखवण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
बाळासाहेब पवार यांनी या चर्चेला आणखी वेगळेच स्वरूप दिले. जिथे कामे खतवाण्यासाठी दहा टक्के पैसे घेतात, तिथे अधिकाऱ्यांची काय चर्चा करायची असा सवाल त्यांनी केल्याने सभेत काही क्षण तणाव निर्माण झाला होता. मात्र त्यावर पुढे फारशी चर्चा न झाल्याने हा मुद्दा निवळला.              

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा